कोल्हापुरात एक-एक सदस्यासाठी नेत्यांचा आटापिटा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

शिवसेनेनेही आपला निर्णय गुलदस्त्यातच ठेवला आहे, मात्र त्यांचे चार सदस्य यापूर्वीच कॉंग्रेस आघाडीसोबत सहलीवर रवाना झाले आहेत.

कोल्हापूर : जिल्हा परिषदेत सत्ता मिळवण्यासाठी आवश्‍यक बहुमत गाठण्यासाठी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांचा आज दिवसभर आटापिटा सुरू आहे. स्थानिक आघाड्यांतून निवडून आलेल्या सदस्यांच्या नेत्यांनी मात्र दोन्ही बाजूंना झुलवत ठेवत 'बहुमत दाखवा मग बघू' अशी भूमिका घेतल्याने उद्या (ता.21) अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होईपर्यंत कोण कोणासोबत याची उत्सुकता कायम रहाणार आहे.

जिल्हा परिषदेत दोन्ही आघाड्यांकडून बहुमताचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात स्थानिक दोन आघाड्यांचा निर्णय काय होणार यावरच सत्तेचे गणित अवलंबून आहे. काँग्रेसचे निरीक्षक माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे कालपासून कोल्हापुरात आहेत. त्यांनी आज काँग्रेसचे माजी आमदार बजरंग देसाई यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सायंकाळी हॉटेल सयाजी येथे देसाई व बागवे यांची पुन्हा भेट झाली.

आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी इचलकंजीत जाऊन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी श्री. आवाडे यांनी पुन्हा एकदा अध्यक्ष पदाचा उमेदवार बदला आघाडीच पक्षात विलीन करतो अशी भुमिका घेतल्याचे समजते. श्री. आवाडे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होते, पण त्यात यश आले नव्हते. दुसरीकडे शिवसेनेनेही आपला निर्णय गुलदस्त्यातच ठेवला आहे, मात्र त्यांचे चार सदस्य यापुर्वीच काँग्रेस आघाडीसोबत सहलीवर रवाना झाले आहेत.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी शाहुपुरीतील दादा बॅंकेत बसूनच हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांनी काल अपक्ष उमेदवार रसिका पाटील यांचे सासरे व उद्योजक व्ही. बी. पाटील यांची भेट घेऊन पाठिंब्याची विनंती केल. पण सुनेला काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याचा राग त्यांना आहे. त्यातून त्यांनीही आपला निर्णय अजून जाहीर केलेला नाही. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडीक हेही श्री. पाटील यांच्या संपर्कात सकाळपासून आहेत.

आवाडे गटाबरोबरच चंदगड आघाडीच्या नेत्या सौ. नंदीती बाभुळकर यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न सुूरु आहेत. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडून सौ. बाभूळकर यांना निरोप देण्याची व्यवस्था केली आहे. "स्वाभिमानी' चे खासदार राजू शेट्टी यांनीही फोनवरून पी. एन. पाटील यांच्याशी चर्चा करून सोबत राहण्याचा शब्द दिला आहे. सायंकाळपर्यंत आपले सदस्य देतो असा त्यांचा निरोप होता पण उशीरापर्यंत त्यांचे सदस्य काँग्रेस गोटात दिसले नाहीत.

हॉटेल, बॅंक हालचालींचे केंद्र
आज दिवसभराच्या घडामोडीचे काँग्रेस आघाडीच्या नेत्यांचे हॉटेल सयाजी व शाहुपुरीतील श्रीपतरावदादा बॅंक केंद्र राहीले. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांचा ठिय्या काहीवेळ त्यांच्या बंगल्यात तर काहीवेळ सदस्यांच्या नेत्यांच्या भेटीगाठीतच गेला. या दोन्ही ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते, "गोकुळ' चे संचालक यांची मोठी गर्दी होती.

शिवसेनेनेही झुंजवलेच
शिवसेना काँग्रेससोबत जाणार असा निर्णय होण्याची अपेक्षा होती, पण रात्री उशीरापर्यंत हा निर्णय न घेता त्यांनी काँग्रेसलाच झुलवत ठेवले. मात्र, सेनेचे आमदार सत्यजित पाटील यांचे दोन, प्रकाश अबीटकर यांचे चिन्हावरील एक व आघाडीचे दोन मिळून तीन तर आमदार उल्हास पाटील यांचा एक असे सहा सदस्य यापुर्वीच काँग्रेस आघाडीसोबत असल्याचे स्पष्ट आहे. यात ताराराणी आघाडीचा एका सदस्याचा समावेश आहे. जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील यांच्या कार्यकर्त्या राणी खलमट्टी काँग्रेससोबतच राहतील असे या घडीला दिसते.

Web Title: kolhapur zilla parishad see close political fight