कोल्हापूर झेडपीत त्रिशंकू स्थिती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

दोन्ही कॉंग्रेसला संधी - भाजपची जोरदार मुसंडी; सेनेने साथ दिल्यास महायुती सत्तेवर

दोन्ही कॉंग्रेसला संधी - भाजपची जोरदार मुसंडी; सेनेने साथ दिल्यास महायुती सत्तेवर
कोल्हापूर - राजकीय विश्‍लेषकांचे अंदाज चुकवत मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत भाजपने जोरदार मुसंडी मारली असून, संपूर्ण निकालानंतर जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. दोन्ही कॉंग्रेसला बहुमतासाठी आठ सदस्यांची गरज आहे, त्यांना अपक्षांसह स्थानिक आघाडीने साथ दिली तर दोन्ही कॉंग्रेस सत्तेवर येतील, तर शिवसेनेने भाजपला साथ दिली तर अध्यक्ष भाजपचा होईल, अशी शक्‍यता आहे.

जिल्हा परिषदेसाठी मंगळवारी (ता. 21) चुरशीने 77 टक्के मतदान झाले होते. आज या निवडणुकीची मतमोजणी पार पाडली. पहिला निकाल गगनबावडा तालुक्‍याचा लागला. या तालुक्‍यातील दोन्ही जागा जिंकत कॉंग्रेसने विजयी सलामी दिली. मात्र, कॉंग्रेसचे बालेकिल्ले असलेल्या करवीर, हातकणंगलेसह चंदगड, आजरामध्ये या पक्षाचे पानिपत झाले.

दोन्ही कॉंग्रेसच्या तुलनेत भारतीय जनता पक्षाने मात्र जोरदार मुसंडी मारली असून, पक्षाच्या चिन्हावर 14 उमेदवार विजयी झाले आहेत. मावळत्या सभागृहात केवळ एक सदस्य भाजपचा होता. त्यांच्यासोबत आघाडी केलेल्या ताराराणी आघाडीलाही पाच जागा मिळाल्या आहेत.

शिवसेनेनेही या वेळी दहा जागांवर विजय मिळवला आहे. सेना-भाजप युती झाल्यास ताराराणी आघाडीचेही पाच सदस्य या आघाडीसोबत राहतील. त्यानंतर या आघाडीचे संख्याबळ 29 होईल, नगरपालिका निवडणुकीत भाजपसोबत राहिलेल्या जनसुराज्य शक्‍तीलाही सहा जागा मिळाल्या आहेत. भाजप-सेना-ताराराणी-जनसुराज्य अशी आघाडी झाल्यास जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष होण्याची शक्‍यता आहे. हे गणित शिवसेनेच्या भूमिकेवर अवलंबून आहे. मुंबईत शिवसेना भाजपला सोबत घेणार का, यावर कोल्हापुरातील ही आघाडी अवलंबून आहे.

सद्यःस्थितीत कॉंग्रेसचे 16, राष्ट्रवादीचे 11, शाहू आघाडीचे दोन, एक अपक्ष, दोन आवाडे गटाचे असे 32 सदस्य होतात. बहुमतासाठी 34 सदस्यांची गरज आहे. चंदगड तालुक्‍यात राष्ट्रवादीचे दोन सदस्य भाजप आघाडीतून विजयी झाले आहेत. आमदार संध्यादेवी कुपेकर यांना मानणाऱ्या या दोन सदस्यांचा पाठिंबा कॉंग्रेस आघाडीला मिळाल्यास आघाडीचा सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर होण्याची शक्‍यता आहे. भाजपने ही सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेशी चर्चा सुरू केली. शिवसेना बरोबर आल्यावर भाजपच्या 14, शिवसेनेच्या 10, स्वाभिमानी संघटना 2, जनसुराज्य 6, ताराराणी आघाडी 3 अशी सत्तेची गोळाबेरीज होऊ शकते.

कोल्हापूर जिल्हा परिषद 67 जागा
भाजप - 14
कॉंग्रेस- 14
राष्ट्रवादी कॉंग्रेस- 11
शिवसेना - 10
जनसुराज्य - 6
भूदरगड आघाडी - 2
चंदगड (युवक क्रांती आघाडी)- 2
स्वाभिमानी - 2
ताराराणी आघाडी पक्ष- 3
अपक्ष( शिंगणापूर )- 1
आवाडे गट - 2.

- शिवसेना भाजपसोबत आल्यास सत्ता मिळवू शकते
- कॉंग्रेसला अंतर्गत मतभेदाचा फटका
- घराणेशाहीला मतदारांचा दणका

Web Title: kolhapur zp confussion