अध्यक्षपदाचा उमेदवार बदला, मग बघू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज कॉंग्रेसचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, माजी आमदार के. पी. पाटील यांची भेट घेतली. एका हॉटेलमध्ये या नेत्यांत झालेल्या बैठकीत "अध्यक्षपदाचा उमेदवार बदलणार असाल तर विचार करू' अशी भूमिका घेत श्री. आवाडे यांनी दबावतंत्र बाहेर काढल्याचे समजते. 

कोल्हापूर - जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज कॉंग्रेसचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, माजी आमदार के. पी. पाटील यांची भेट घेतली. एका हॉटेलमध्ये या नेत्यांत झालेल्या बैठकीत "अध्यक्षपदाचा उमेदवार बदलणार असाल तर विचार करू' अशी भूमिका घेत श्री. आवाडे यांनी दबावतंत्र बाहेर काढल्याचे समजते. 

अध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी (ता. 21) होत आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्याने स्थानिक आघाडीतून निवडून आलेल्या एका एका सदस्यांना महत्त्व आले. त्यामुळेच आपला अध्यक्ष होईल असे ठामपणे कोणी सांगू शकत नाही. मात्र, आपलाच अध्यक्ष करण्यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. 

काल (ता. 18) भाजप उमेदवारांसाठी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी थेट रिंगणात उडी घेतली. त्यांच्या स्नूषा शौमिका महाडिक या उमेदवार निश्‍चित आहेत. त्यांच्यासाठी श्री. महाडिक यांनी कालच माजी मंत्री आवाडे व त्यांचे वडील माजी खासदार कल्लाप्पा आवाडे यांची भेट घेतली. 

आज कॉंग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली. या बैठकीला प्रकाश आवाडे उपस्थित होते. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील यावेळी उपस्थित होते. कॉंग्रेसकडून पी. एन. यांचे पुत्र राहुल यांची उमेदवारी निश्‍चित आहे. ही उमेदवारी श्री. आवाडे यांना मान्य नाही. उमेदवार बदलणार असाल तर पाठिंब्याचा विचार करू, असे श्री. आवाडे यांनी या बैठकीत सांगितल्याचे समजते. 

सहा-सात वर्षांपूर्वी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावरून आवाडे-पी.एन. वाद झाला होता. त्यातून आवाडेसमर्थकांना कॉंग्रेस कमिटीच्या दारातच बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर या-ना त्या कारणाने हा वाद धुमसतच राहिला. या घडामोडीच्या निमित्ताने श्री. आवाडे यांच्याकडून त्याचेच उट्टे शांतपणे काढणे सुरू असल्याची चर्चा आहे. 

तरीही अपात्रतेची टांगती तलवार 
अध्यक्ष निवडीदिवशी काही सदस्यांना गैरहजर ठेवण्याची रणनीती विरोधकांकडून आखली जात आहे. यात शिवसेनेचे काही सदस्य गैरहजर राहतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे; पण या सदस्यांनी अधिकृत नोंदणी केली नसली तरी जिल्हाप्रमुख किंवा प्रदेशप्रमुख त्यांना व्हीप बजावू शकतात. त्यानंतरही ते गैरहजर राहिल्यास त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार राहण्याची शक्‍यता आहे. सर्वोच्च न्यायालयानेच यासंदर्भातील दिलेल्या काही निकालांचा आधार यासाठी घेतला जाणार आहे. 

सहलीवरील सदस्य आज परतणार 
गेल्या दोन-तीन दिवसांपासून दोन्ही आघाड्यांचे सदस्य सहलीवर आहेत. भाजप आघाडीचे सदस्य गोव्यात, तर कॉंग्रेस आघाडीचे सदस्य कोकणच्या दौऱ्यावर आहेत. दोन्ही आघाडींच्या सदस्यांना उद्या सायंकाळपर्यंत शहराला लागूनच असलेल्या ठिकाणी स्वतंत्रपणे एकत्रित आणण्यात येणार आहे. या ठिकाणी पक्षाच्या सदस्यांना व्हीप बजावण्यात येणार आहे. तेथून मंगळवारी दुपारीच त्यांना सभागृहात आणले जाण्याची शक्‍यता आहे. 

हालचाली गतिमान 
अध्यक्ष निवडीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. महादेवराव महाडिक यांची सुत्रे राजाराम कारखान्यातून, तर पी. एन. पाटील हे बॅंकेत बसून सदस्य व त्यांच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. आमदार मुश्रीफ आज दिवसभर ताराबाई पार्कातील त्यांच्या बंगल्यात बसून हालचालींचा अंदाज घेत होते. भाजप नेत्यांची बैठकही रात्री उशिरा शहरातील एका हॉटेलमध्ये झाली. 

Web Title: kolhapur zp president election