
Old Pension Scheme: जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी बेमुदत आंदोलन!
Kolhapur News : महाराष्ट्र राज्य कर्मचारी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी बेमुदत आंदोलन केले जाणार आहे. त्याला महापालिका कर्मचारी संघाने संपूर्ण पाठींबा दिला आहे.
त्यामुळे मंगळवारपासून सुरू होणाऱ्या आंदोलनात महापालिकेचे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता कायम तसेच रोजंदारीवरील साडेतीन हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्याबाबतचे पत्र संघाने महापालिका प्रशासनाला दिले आहे.
पाणीपुरवठा वितरण, अग्निशमन विभाग व आरोग्य सेवेतील कर्मचारी वगळून इतर सर्व आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाराही आहेत.राज्यभरातील संघटनेने आंदोलनाची हाक दिली असल्याने त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला.
यावेळी उपाध्यक्ष विजय चरापले, कार्याध्यक्ष विजय वणकुद्रे व जनरल सेक्रेटरी दिनकर आवळे, अजित तिवले, खजानिस सिकंदर सोनुले, अनिल साळोखे, अभिजीत सरनाईक, महादेव कांबळे, मारूती दाभाडे, अन्वर शेख, अनिता रूईकर उपस्थित होते. त्यानंतर आज संघाने प्रशासनाला पत्र दिले.
प्रशासनाकडून कामावर येण्याचे आवाहन केले असले तरी अत्यावश्यक सेवा वगळली असल्याने इतर कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार असे संघाने कळवले आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजता महापलिकेसमोर जमण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना केले आहे.
केएमटी सहभागी नाही
केएमटी कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार नसल्याने केएमटी सेवा सुरू राहणार असल्याचे मान्यताप्राप्त संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी सांगितले.