इचलकरंजी पालिकेला हवाय कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त

वाढत्या आंदोलनांमुळे प्रशासनाचा निर्णय : जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना प्रस्ताव पाठवणार
इचलकरंजी
इचलकरंजी sakal

इचलकरंजी : विविध नागरी प्रश्नांवर पालिकेवर नागरिकांचे सतत मोर्चे येतात. विविध प्रकारची तीव्र स्वरूपाची आंदोलने होतात. यातून काही वेळा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अशा आंदोलनाचा पालिका प्रशासनाने धसका घेतला आहे. यासाठी पालिकेमध्ये कार्यालयीन कामकाजावेळी कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त ठेवण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार केला आहे. सभागृहाच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिसप्रमुख यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.

इचलकरंजी
'गोकुळ'ला 55 कोटींचा तोटा; शौमिका महाडिक यांचा हल्लाबोल

जिल्ह्यातील सर्वात मोठी इचलकरंजी पालिका आहे. इतर शहरांप्रमाणे इचलकरंजीमध्येही अनेक नागरी प्रश्न सातत्याने निर्माण होत असतात. या प्रश्नांवर विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष, विशिष्ट समूह पालिकेवर मोर्चा काढून आंदोलन करीत असतात. यावेळी आंदोलक व अधिकारी यांच्यात वादावादीचे प्रसंग निर्माण होऊन तणावपूर्ण वातावरण होत असते.

काही वेळा गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. यापूर्वी आत्मदहन, आत्मदहनाचा प्रयत्न, असे गंभीर प्रकारही यातूनच घडले आहेत. एकूणच आंदोलक आक्रमक झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. याशिवाय पालिकेची सार्वत्रिक निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे आंदोलनाची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

या सर्व पार्श्वभूमीचा आढावा घेऊन पालिका प्रशासनाकडून पालिका प्रशासकीय इमारतीत कार्यालयीन वेळेत कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त ठेवण्याबाबतचा एक प्रस्ताव तयार केला आहे. आंदोलनावेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दोन पोलिस कर्मचारी कार्यालयीन वेळेत प्रशासकीय इमारतीत कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्याचा प्रस्ताव आहे.

यासाठी सेवा शुल्क व बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांसाठी बैठक व्यवस्था यावर निर्णय घेतला जाणार आहे. त्याला सभागृहाने मंजुरी दिल्यानंतर हा प्रस्ताव जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे.

आंदोलनाला शिस्त लावण्याचा प्रयत्न

पोलिस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मोर्चाला शिस्त लावण्यात येणार आहे. यामध्ये मोर्चेकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारासमोरच रोखले जाणार आहे. आंदोलकांच्या पाच जणांच्या शिष्टमंडळालाच चर्चेसाठी सोडले जाणार आहे. इतर शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी अशी व्यवस्था आहे. ही व्यवस्था पालिकेच्या ठिकाणीही करणे गरजेचे आहे, असे मत प्रशासनाकडून प्रस्तावामध्ये व्यक्त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com