esakal | गडहिंग्लजला आणखी एक कोविड सेंटर

बोलून बातमी शोधा

Another Covid Center At Gadhinglaj Kolhapur Marathi News

कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी गडहिंग्लज तालुक्‍यात आणखी एक कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. कानडेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हे सेंटर सुरू केले जाणार आहे.

गडहिंग्लजला आणखी एक कोविड सेंटर
sakal_logo
By
अवधूत पाटील

गडहिंग्लज : कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी गडहिंग्लज तालुक्‍यात आणखी एक कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. कानडेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हे सेंटर सुरू केले जाणार आहे. दरम्यान, येथील शेंद्री रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह आरोग्य विभागाने पुन्हा ताब्यात घेतले. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर या कोविड केअर सेंटरमध्ये आवश्‍यक बाबींची पूर्तता केली जात आहे. 

कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. येथील शेंद्री रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह पुन्हा ताब्यात घेतले आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये 81 बेडची व्यवस्था आहे. त्याची स्वच्छता करून घेतली आहे. कोरोना रुग्णांसाठी आवश्‍यक असणाऱ्या औषधांसह अन्य बाबींची पूर्तता केली जात आहे. 

दरम्यान, या एका कोविड केअर सेंटरशिवाय आणखी एका सेंटरसाठी हालचाली सुरू आहेत. कानडेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हे सेंटर सुरू केले जाणार आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांसाठी जादाचे 20 बेड उपलब्ध होणार आहेत. मात्र, या ठिकाणी कोविड सेंटर सुरू झाले तर प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमित उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे काय, हा प्रश्‍न आहे. त्याची पर्यायी व्यवस्था करूनच येथे कोविड केअर सेंटर सुरू केले जाईल, असे समजते. 

जुन्याच कर्मचाऱ्यांना नियुक्ती? 
कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोविड केअर सेंटरमध्ये कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. सेंटर बंद झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले होते. मात्र, त्यांना शेवटच्या अडीच महिन्यांचे मानधन अद्याप मिळालेले नाही. हा प्रश्‍न प्रलंबित असतानाच आता पुन्हा त्यांची गरज निर्माण झाली आहे. रुग्णसंख्या वाढल्यास जुन्याच कर्मचाऱ्यांना पुन्हा नियुक्ती दिली जाणार असल्याचे समजते. 

"उपजिल्हा'त 37 रुग्णांवर उपचार... 
येथील उपजिल्हा रुग्णालयात समर्पित कोविड रुग्णालय केले आहे. कोरोना रुग्णांसाठी 50 बेड राखीव ठेवले आहेत. सध्या 37 रुग्ण उपचार घेत आहेत. आजरा व चंदगड येथील रुग्णही उपजिल्हा समर्पित कोविड रुग्णालयात येत आहेत. गडहिंग्लजसह आजरा व चंदगडचे कोविड केअर सेंटर अद्याप सुरू नसल्याने सारा ताण उपजिल्हा समर्पित कोविड रुग्णालयावर आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur