Crime : कोल्हापुरात धाडसी दरोडा! भरदिवसा गोळीबार करत लुटलं सोन्याचं दुकान; थरारक घटनेचा Video Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video Viral

Crime : कोल्हापुरात धाडसी दरोडा! भरदिवसा गोळीबार करत लुटलं सोन्याचं दुकान; थरारक घटनेचा Video Viral

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये चार दरोडेखोरांनी एका सोन्याच्या दुकानावर भरदिवसा दरोडा टाकल्याची थरारक घटना घडली आहे. दोन दुचाकीवरून आलेल्या सराईत दरोडेखोरांनी गोळीबार करत हा दरोडा टाकला असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तब्बल दोन कोटी रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

अधिक माहितीनुसार, कोल्हापूर शहरापासून ७ किमी अंतरावर कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावरील बालिंगा (ता. करवीर) येथे वर्दळीच्या मध्यवर्ती चौकात कात्यायनी ज्वेलर्स हे सराफी दुकान आहे.

तर गुरूवारी दुपारच्या सुमारास दरोडेखोरांनी दुकान मालकासह त्याच्या मेव्हण्यावर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये दुकानाचे मालक रमेश शंकरजी माळी (वय ४०) आणि त्यांचे मेव्हुणे जितू मोड्याजी माळी (३०, दोघे रा. बालिंगा) हे दोघे जखमी झाले.

या लुटीमध्ये तीन किलो तयार सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. याशिवाय 1 लाख 80 हजारांची रोकडही लुटण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दोन चोर दुकानाच्या दरवाजाजवळ उभे असल्याचं दिसत आहे. तर आतमध्ये असलेल्या दोन चोरांनी सोने आणि मुद्देमाल गोणीत आणि बॅगेत भरून आणल्याचं दिसत आहे.

दरवाजा जवळ उभा असलेला दरोडेखोर गोळीबार करत असून त्याच्या पायाजवळ एक व्यक्ती खाली पडलेला दिसत आहे. तर मुद्देमाल भरून आणल्यानंतर त्यांनी दोन दुचाकीवरून पळ काढला आहे. यानंतर त्यांनी गावकऱ्यांच्या दिशेने गोळीबार केला आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

टॅग्स :tweetviral video