शाहू मिल पुन्हा सुरू करणार; चंद्रकांत पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil

शाहू मिल पुन्हा सुरू करणार; चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : शाहू मिलमधील ११ एकर हेरिटेज जागा सोडून उर्वरित जागेमध्ये शासन आणि खासगी भागीदारीतून पुन्हा शाहू मिल सुरू करणार. यामुळे शहरात रोजगारनिर्मिती होईल. याबाबतची अधिकृत घोषणा मी राज्याचा वस्त्रोद्योग मंत्री म्हणून १ जानेवारीपूर्वी करणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. कॉमन मॅन संघटनेने दिलेले निवेदन स्वीकारताना त्यांनी ही माहिती दिली. उद्योग उभारून रोजगारनिर्मिती करण्याच्या उद्देशाने राजर्षी शाहू महाराजांनी त्याकाळी येथे शाहू मिल ही सूतगिरणी सुरू केली. स्वातंत्र्यानंतरही शाहू मिल सुरू होती.

२००५ दरम्यान शाहू मिल बंद झाली. या ठिकाणी शाहू महाराजांचे स्मारक उभे करावे, अशी मागणी होत होती. कॉमन मॅन संघटनेच्या प्रयत्नानंतर येथे भोंगा लावण्यात आला. पुन्हा एकदा शाहू मिलचा भोंगा वाजावा अशी नागरिकांची अपेक्षा होती. कॉमन मॅन संघटनेचे अध्यक्ष ॲड. बाबा इंदुलकर यांनी मंत्री पाटील यांना शाहू मिल संदर्भात निवेदन दिले. त्यावेळी मंत्री पाटील म्हणाले, ‘शाहू मिलच्या एकूण जागेतील ११ एकर जागा ही हेरिटेज आहे. ही जागा सोडून उर्वरित जागेमध्ये वस्त्रोद्योग मंत्रालय आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधून पुन्हा शाहू मिल सुरू केली जाणार आहे. यातून स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण होईल. याबाबतची अधिकृत घोषणा राज्याच्या वस्त्रोद्योग मंत्री म्हणून मी १ जानेवारी २०२३ पूर्वी करेन.’

यावेळी तीन आसनी प्रवासी रिक्षा व्यावसायिक समितीने पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळ कल्याणकारी मंडळाचा प्रलंबित असलेला प्रश्न व त्यामुळे तीन आसनी रिक्षा व्यावसायिकांचा खुंटलेला विकास याची व्यथा मांडली. मुख्यमंत्री यांनी हा विषय गांभीर्यानी घेतला असून कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याला काही कालावधी लागतो, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. भरमसाट वाढलेल्या विम्याच्या दराबाबत पुणे येथे केंद्रीय परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात ॲड. बाबा इंदुलकर, सुभाष शेटे, ईश्वर चनी, शंकर पंडित, रमेश पोवार, राजू पोवार, अविनाश दिंडे, नरेंद्र पाटील यांचा सहभाग होता.

शाहू मिल पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमच्या शिष्टमंडळाला दिले. शाहू मिल पुन्हा सुरू झाल्यास त्यातून रोजगार निर्मिती होईल. ती राजर्षी शाहू महाराजांना कृतिशील आदरांजली ठरेल.
- ॲड. बाबा इंदुलकर (अध्यक्ष, कॉमन मॅन संघटना)