गडहिंग्लजला चित्ररथांतून उलगडला शिवरायांचा जीवनपट

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti in Gadhinglaj Kolhapur Marathi News
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti in Gadhinglaj Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : येथील पालिकेच्या पुढाकाराने आणि शहरातील विविध तरुण मंडळे, स्वयंसेवी संघटनांच्या सहभागाने आज येथे शिवजयंती लोकोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. शिवजयंतीनिमित्त सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. शोभायात्रेत सहभागी शालेय चिमुकल्यांच्या चित्ररथांद्वारे शिवरायांच्या कर्तृत्वाचा जीवनपट उलगडला. 

"शिवजयंती गडहिंग्लजकरांची' ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून आजच्या मिरवणुकीत सर्व घटकांना सहभागी होण्याचे पालिकेने आवाहन केले होते. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. माजी आमदार ऍड. श्रीपतराव शिंदे, नगराध्यक्षा स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष महेश कोरी, पक्षप्रतोद बसवराज खणगावे, सर्व नगरसेवक, नगरसेविका, विविध तरुण मंडळांचे प्रतिनिधी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पालिकेच्या प्रांगणातून मिरवणुकीला प्रारंभ झाला. मेन रोड, लक्ष्मी रोड, बाजारपेठ, कडगाव रोडवरुन फिरुन या मिरवणुकीची सांगता दसरा चौकात झाली. 

मिरवणुकीत पालिका शिक्षण मंडळासह खासगी शिक्षण संस्थांच्या वीसहून अधिक शाळांचे चित्ररथ सहभागी झाले होते. बॅ नाथ पै प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला शिवरायांचा अरमार दल हा चित्ररथ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. या रथात लावलेली तोफ लक्ष वेधून घेत होती. शिवराज्याभिषेक दिन, स्वराज्य प्रतिज्ञा, शिवकालीन बारा बलुतेदारी गाव, सावित्रीच्या लेकी आदी आशयावर आधारीत असलेल्या आणि शिवरायांच्या कर्तृत्वाला उजाळा देणारे चित्ररथ पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा शिवप्रेमींची गर्दी झाली होती.

महिला, तरुणी आणि तरुणांनी भगवे फेटे परिधान करुन मिरवणुकीत सहभागी झाले होते. क्रिएटिव्ह प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे झांज पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नामदेव शिंपी समाज मंडळाने पालखीत छत्रपती शिवरायांची प्रतिमा ठेवली होती. पालखीसमोर सहभागी समाजबांधवांनी टाळ-मृदूंगाच्या निनादात भजनाचा ताल धरला होता. 

मिरवणुकीतील ठळक 
- मिरवणुकीच्या अग्रभागी घोडे आणि पंधरा बैलजोड्यांचा सहभाग 
- विविध वेशभूषा करुन महिला, तरुणी घोड्यांवर आरुढ झाल्या होत्या 
- फेटे आणि झेंड्यामुळे वातावरण भगवेमय 
- मुलींनी सादर केलेली लाठी-काठी, लेझीम लक्षवेधी 
- झांज पथकाच्या दणदणाटाने मिरवणुकीत रंगत 
- 20 हून अधिक चित्ररथांचा सहभाग 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com