कोल्‍हापूर जिल्ह्यात बालविवाह ‘धूमधडाक्या’त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालविवाह

कोल्‍हापूर जिल्ह्यात बालविवाह ‘धूमधडाक्या’त

कोल्‍हापूर - कायद्याने बालविवाहास प्रतिबंध असला तरी आजही मोठ्या धुमधडाक्यात बालविवाह होत असल्याचे दिसत आहे. हे प्रमाण कमी होण्याऐवजी वर्षानुवर्षे वाढत आहे, ही सर्वांत मोठी चिंतेची आणि चिंतनाची बाब आहे. बालविवाह होऊ नयेत यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्‍न सुरू आहेत. तरीही बालविवाहाचा टक्‍का वाढतोय, याबाबत पोलिस, प्रशासन, विविध समित्या आणि अर्थातच पालकांनीही याचा गंभीर विचार करण्याची गरज आहे. जिल्‍ह्याचा विचार करता दरवर्षी दुप्‍पटीने बालविवाहाची संख्या वाढत आहे. यावर्षी तर चार महिन्यांतच १९ बालविवाहांची नोंद झाली आहे; मात्र ही नोंद करताना त्याबाबत गुन्‍हे दाखल करणे व या प्रकरणांची लवकर सुनावणी घेऊन दोषींवर कारवाई करणेही तितकेच गरजेचे आहे.

कारवाई होईपर्यंत पाठपुरावा आवश्यक

लग्‍नाच्या वेळी वधूचे वय १८ पेक्षा व वराचे वय २१ पेक्षा कमी असेल तर तो बालविवाह समजला जातो. लहान वयात लग्‍न झाल्याने मुलींच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. अशा सर्व कारणांमुळे बालविवाह प्रतिबंध कायद्यांची निर्मिती केली आहे; मात्र तरीही अनेक ठिकाणी बालविवाह होत आहेत. एक अवघड जबाबदारी, कौटुंबिक अडचणी, प्रेमप्रकरण, आर्थिक अडचणी अशा अनेक कारणांमुळे बालविवाह केले जातात. ते होऊ नयेत यासाठी पोलिस, महिला व बालविकास विभाग, बालकल्याण समितीसह सामाजिक कार्यकर्ते काम करत आहेत. एवढी यंत्रणा असतानाही बालविवाहाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या सर्व यंत्रणांनी आपापली जबाबदारी पार पाडत असताना योग्य समन्‍वय ठेवणे व दोषींवर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करणे आवश्यक आहे; मात्र सध्या तरी तसे दिसत नाही. मागील दोन वर्षांत तर बालविवाहाच्या प्रकरणात गुन्‍हे नोंद होण्याचे प्रमाणही अल्‍प राहिले आहे. या सर्वांचा विचार करून पुढील धोरण ठरवणे आवश्यक आहे.