esakal | इंजेक्‍शनसाठी कायपण; नातेवाईकांची होतेय घालमेल

बोलून बातमी शोधा

Vaccine
इंजेक्‍शनसाठी कायपण; नातेवाईकांची होतेय घालमेल
sakal_logo
By
सदानंद पाटील

कोल्हापूर :जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यातच रुग्णांसाठी आवश्‍यक असणारे रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन मिळत नसल्याने रुग्णांवर तडफडण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात आज अखेर रेमडेसिविरची मागणी 10 हजारावर पोहोचले आहे. तर आत्तापर्यंत पुरवठा मात्र काही शेकड्यातच झाला आहे. मागणी आणि पुरवठ्यात अशीच तफावत राहिली तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्‍यता आहे.

राज्यात सर्वत्रच रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा तुटवडा जाणवत आहे. यातच आरोग्य विभागाने चुकीची माहिती कळवल्याने मोठा गोंधळ उडाला. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सुचनेनंतर माहितीत दुरुस्ती करुन नव्याने इंजेक्‍शनची माहिती मागवण्यात आली. पालकमंत्री पाटील यांच्यासह आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही इंजेक्‍शन मिळवण्याचे प्रयत्न केले. मात्र मागणी खूपच वाढली असल्याने परिस्थिती गंभीर होत आहे.

जिल्हा प्रशासनाकडे शनिवारी (ता.17)35 हॉस्पीटलनी 1 हजार 928 इंजेक्‍शनची मागणी केली होती. मात्र या दिवशी इंजेक्‍शन उपलब्ध झाली नाहीत. रविवारी (ता.18) 42 हॉस्पीटलनी 1 हजार 725 इंजेक्‍शनची मागणी केली. या दिवसापर्यंत 7 हजार 324 इंजेक्‍शनची मागणी केली. मात्र केवळ 764 इंजेक्‍शन उपलब्ध झाली. सोमवारी (ता.19) 3 हजार 960 इंजेक्‍शनची 43 हॉस्पीटलनी मागणी केली. मात्र प्रत्यक्षात 583 इंजेक्‍शन उपलब्ध झाली आहेत. मागील आठ दिवसात इंजेक्‍शनच्या मागणीने 10 हजारचा टप्पा पार केला आहे.मात्र दीड हजार इतकी इंजेक्‍शन उपलब्ध झाली आहेत.

हेही वाचा- शिवसेनेच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्र्यांचा चक्क काॅग्रेस-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना फोन

कोरोनाचा रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याला 9 दिवसाच्या आतच रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन देणे आवश्‍यक आहे. त्यानंतर इंजेक्‍शनचा रुग्णांना फायदा होत नाही. अनेक रुग्णांना इंजेक्‍शनची गरज असताना ती न मिळाल्याने त्यांची तडफड सुरु आहे. काही रुग्णांना तर रुग्णालयात दाखल होवून 9 दिवस होत आले आहेत, अशा रुग्णांची अवस्था बिकट आहे. जर तात्काळ इंजेक्‍शन उपलब्ध झाली नाहीतर मात्र परिस्थिती आटोक्‍याबाहेर जाण्याची शक्‍यता आहे.

इंजेक्‍शनसाठी कायपण

गंभीर कोरोना रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन देणे आवश्‍यक आहे. मात्र ही इंजेक्‍शन मिळत नसल्याने रुग्णासह नातेवाईकांची घालमेल सुरु आहे. शहरात, जिल्ह्यात, परिजिल्ह्यात चौकशी करुन इंजेक्‍शन मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. एका इंजेक्‍शनसाठी चौपट, दसपट किंमत मोजून, मिळेल त्या किंमतीला इंजेक्‍शन उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Edited By- Archana Banage