...त्यानं कोंडलय स्वतःला स्वतःहून एका खोलीत!

Dubai Return youth self Quarantine In Chandgad Kolhapur Marathi news
Dubai Return youth self Quarantine In Chandgad Kolhapur Marathi news

चंदगड : दुबईत नोकरी करणारा तालुक्‍यातील एक तरुण गावाकडे परतला. दुबईत आणि नंतर मुबंई विमानतळावरील आरोग्य तपासणीत त्याचा अहवाल निगेटिव्ह आहे. परंतु या रोगाने जगभरात माजवलेले थैमान अनुभवल्याने त्याने स्वतःसह कुटुंब आणि समाजाची काळजी म्हणून त्याने आल्यापासून स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले आहे. त्याचा दिवस सुरू होतो या खोलीत आणि रात्र होते ती सुद्धा याच खोलीत. 

वैद्यकीय तपासणी करूनच तो पुढचा निर्णय घेणार आहे. आपल्या वर्तनातून त्याने कोरोनाचे गांभीर्य अधोरेखित केले आहेच; परंतु या काळात कसे वागायला हवे याचीही जाणीव करून दिली आहे. पाच वर्षांपासून परदेशात नोकरी करणाऱ्या या तरुणाला नियम आणि कायदे चांगले अवगत आहेत. प्रशासन एखादा निर्णय घेते त्यामागे नागरिकांचेच हित असते यावर त्याचा विश्‍वास आहे. तोंडाला मास्क लावलेल्या अवस्थेत तो घरी आलेला पाहताच आई, वडिलांसह कुटुंबीयांना गहिवरून आले. परंतु त्यांना सावरत त्याने दूरवरूनच समजूत घातली. घराच्या गच्चीवरील एक खोली आणि स्वच्छतागृह स्वतःसाठी राखीव असेल असे सांगून थेट ती खोली गाठली. खोलीत असतानाही तोंडाचा मास्क काढला जात नाही. दोन वेळचे जेवण, चहा-नाष्टा आई देते. परंतु ती खोलीत येत नाही. दरवाजाच्या बाहेरच हे सर्व ठेवले जाते. त्यानंतर तो त्याचे सेवन करतो. 

सध्या आरोग्य विभागाचे कर्मचारी दररोज येऊन त्याची विचारणा करतात. मुळात दुबई आणि मुंबईतील चाचणीत तो निगेटिव्हच आहे. परंतु चौदा दिवसांनंतर त्याची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर तो कुटुंबात सहभागी होईल. खरंतरं दूरवरून आलेली व्यक्ती कुुटुंबात येताच एकमेकाला आलिंगन देतात. आशीर्वाद घेतात. गप्पा गोष्टी होतात परंतु कोरोनाची भयानकता ओळखून त्याने हे सर्व टाळले आहे.

आत्ता काही गोष्टींना मर्यादा घातली तर भविष्यात आपण एकत्र राहण्याचा आनंद उपभोगू हा विचार करून त्याने मनाला आवर घातली आहे. त्याचा हा निर्णय मुंबई, पुण्याहून येणाऱ्या नागरिकांसाठी अनुकरणीय आहे. सध्या गावागावांत याच मुद्यावरून वादाचे प्रसंग उद्‌भवत आहेत. अस्तित्वाच्या कसोटीच्या काळात स्वतःच स्वतःची जबाबदारी मानून निर्णय घेणे गरजेचे असते. तसे ते घेतले जावेत हीच अपेक्षा. 

मोबाईल हाच सोबती... 
बंद, संचारबंदी असताना घरात वेळ जात नाही म्हणून अनेकजण बाहेर पडतात. त्या तरुणालाही वेळ घालवण्याचा प्रश्‍न आहेच. त्याच्या भावाने स्थानिक कंपनीचे सीम कार्ड दिले आहे. या काळात मोबाईल हाच त्याचा सोबती आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com