E-Waste : ई-कचरा, आयटी उद्योगातून नवे उत्पन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

E Waste new income from IT industry

E-Waste : ई-कचरा, आयटी उद्योगातून नवे उत्पन्न

कोल्हापूर : दरवाढच केली तर उत्पन्न वाढते असे होत नाही. ज्यावेळी कराचा बोजा वाढवला जातो त्यावेळी तो चुकवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न होतात. वाढीचा फायदा होत नाही. याऐवजी माफक कर ठेवून जास्तीत जास्त करदात्यांकडून उत्पन्न मिळवणे तसेच ई-कचरा, आयटी उद्योग, बॉंड यासारखे उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधले पाहिजेत, अशी सूचना अर्थ क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांनी केली.

आगामी महापालिका अंदाजपत्रकाच्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ ने ‘आमचं शहर, आमचं बजेट’ या उपक्रमांतर्गत कररचना व उत्पन्नाचे नवीन मार्ग या विषयावर शहरवासीयांची मते जाणून घेतली. कोल्हापूर सराफ व्यापारी संघामध्ये झालेल्या चर्चेत चार्टर्ड अकौंटट, आयटी, गुंतवणूक अन्य व्यावसायिकांचे प्रतिनिधी सहभागी झाले.

घरफाळा वा पाणीपट्टी वा इतर कर आकारणीमध्ये सुसूत्रीकरण अत्यावश्‍यक असल्याचे सांगताना महापालिका प्रशासनाने कररचना व दरात बदलाची गरज व्यक्त केली. हद्दवाढ नसल्याने मिळकतींची संख्या मर्यादित आहे. त्याऐवजी जे घरफाळा वा पाणीपट्टी भरत नाहीत अशा मिळकतधारकांचा शोध आवश्‍यक आहे. तसेच माफक कर भरला तर तो चुकवण्याचा कुणी विचार करत नाही व चुकवेगिरी, थकबाकी हे प्रश्‍न निर्माण होणार नाहीत.

खर्चात बचत म्हणजे उत्पन्नात वाढ

प्रशासनावर ५० ते ६० टक्क्यांवर होणारा खर्च गांभीर्याने घ्यावा. सध्याच्या परिस्थितीत मनुष्यबळाचा योग्य व काटेकोर वापर करण्याबरोबरच सेवांमध्ये जास्तीत जास्त सुधारणा करावी. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा. आयटी क्षेत्रासाठी राज्य सरकारच्या प्रोत्साहनपर योजना आहेत. त्यातून उत्पन्न मिळू शकते.

या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने वाहतूक व्यवस्थेचे नियोजन केले तर प्रवाशांची कायम संख्या मिळून उत्पन्न वाढू शकते. व्यापारी आणि तज्ज्ञांचा दबावगट तयार केल्यास त्यातून विकासकामांवर लक्ष ठेवले जाईल. यात्री निवाससारख्या नवीन संकल्पनांना कायद्याच्या चौकटीत आणून उत्पन्न वाढू शकते. दिवसभर दिवे सुरू, वाहून जाणारे पाणी, रिकाम्या पळणाऱ्या बस यातून होणारा अनावश्‍यक खर्च वाचवला तर त्यातून उत्पन्नात भर पडू शकते. खर्चात बचत म्हणजे उत्पन्नात वाढ ही संकल्पना अवलंबावी, असेही सुचवले.

 • राजेश राठोड, अध्यक्ष, कोल्हापूर सराफ व्यापारी संघ ः कर सामान्यांना पेलणारे असावेत

 • विपिन गावडा, अध्यक्ष, कोल्हापूर इन्व्हेस्टर्स असोसिएशन ः बॉंडमधून परदेशस्थ शहरवासीयांकडून निधी उभारा

 • कैलास मेढे, समन्वयक, कोल्हापूर आयटी पार्क ः आयटी तसेच ई-कचरा मॅनेजमेंट, कार्बन सेव्हिंगमधून उत्पन्न मिळेल

 • दीपेश गुंदेशा, चार्टर्ड अकौंटंट ः खर्चातील मोठी गळती शोधल्यास निधीची मोठी बचत होईल

 • मनीष झंवर, गुंतवणूकदार ः पर्यटकांची गरज ओळखून सेवा दिल्यास उत्पन्न मिळेल

 • शाम जोशी, अध्यक्ष, महाद्वार रोड व्यापारी असोसिएशन ः शहरातील पर्यटनस्थळांवर शुल्क आकारावे

 • सत्यजित खाडे, बेकरी व्यावसायिक ः विविध परवानगी तातडीने देण्याची सोय हवी

 • शशिकांत देढिया, व्यावसायिक ः पे ॲंड पार्किंगची व्यवस्था सध्या आवश्‍यक आहे.

सूचना अशा...

 • पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधून प्रकल्प राबवावेत

 • प्रत्येक प्रकल्प वेळेत पूर्ण करावा

 • कामाच्या दर्जासाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारी टाका

 • मोजकेच प्रकल्प एकात्मिक पद्धतीने राबवा

 • आयटी कंपन्यांच्या रजिस्‍ट्रेशनचे धोरण अवलंबावे

 • पर्यटन हेच उत्पन्नाचे साधन हे धोरण स्वीकारावे

 • अनावश्‍यक खर्चासाठी कारणीभूत कर्मचाऱ्यांवर दंड आकारा

 • पीपीपी तत्त्वावर उद्यानांचा, पर्यटनस्थळांचा विकास करा

टॅग्स :Kolhapurtaxe-wastewaste