कोल्हापूर : पराभवातही भविष्यातील विजयाची नांदी

भाजपचे मताधिक्य वाढले; संघटनात्मक बदलांची गरज ठळक
Kolhapur
KolhapurSakal

कोल्हापूर - भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सत्यजित ऊर्फ नाना कदम यांनी ७७ हजार ८०६ मते मिळवली. त्यांचा १९ हजार २१० मतांनी पराभव झाला. २०१४ मध्ये भाजपला ४२ हजार मते मिळाली होती. तुलनेत ३५ हजार ८०६ मते भाजपला अधिकची मिळाली. यामुळे शहरात भाजपचा हक्काचा मतदार तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे भाजपचा उमेदवार जरी पराभूत झाला असला, तरी ही उद्याच्या विजयाची नांदी ठरू शकते.

माजी आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधन झाल्याने पोटनिवडणूक लागणार व ती बिनविरोध होणार नाही, हे पालकमंत्री सतेज पाटील यांनी जाणले. त्यानुसार त्यांनी सूक्ष्म नियोजन करण्यास लवकर प्रारंभ केला. तुलनेत सत्यजीत कदम यांची उमेदवारी जाहीर करण्यास बराच वेळ झाला. पर्यायाने प्रचारालाही कमी कालावधी मिळाला. बुथरचना आणि शक्ती केंद्र या माध्यमातून निवडणुका जिंकण्याचे तंत्र विकसित करणाऱ्या भाजपची शहरातील बहुतांशी बुथरचना केवळ कादावरच असल्याचे निवडणुकीने दाखवले. निवडणुकीत विजयाचा माहोल तयार करण्यात भाजपची यंत्रणा यशस्वी ठरली; पण माहोल तयार झाला असली तरी पक्षाला विजयासाठी लागणारी बेरीज प्रत्यक्षात आणता आली नाही. रुईकर कॉलनी, कदमवाडी, जाधववाडीत अपेक्षित मताधिक्क्य न मिळाल्याने पंपावरच्या कार्यकर्त्यांनाही धाव कुंपणापर्यंतच असल्याची जाणीव झाली असवी. महानगर कार्यकार्यकारिणीतील पदाधिकऱ्यांच्या मर्यादाही निवडणुकीने दाखवून दिल्या. त्यामुळे ही पोटनिवडणूक भाजपला अनेक गोष्टींचे भान देणारी ठरली.

पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच भाजप ‘त्या चौकडी’च्या बाहेर पडला. महाडिक गट आणि भाजपचे मुळचे कार्यकर्ते यांच्यात चांगला समन्वय दिसून आला. पाच ते सहा जणांचा अपवाद सोडला तर सर्वांनी एक दिलाने काम केले. शिवसेनेचे अपेक्षित मतदान भाजपला मिळाली नाहीत; पण भाजपला मानणारा मतदारांचा वर्ग शहरात असल्याचे वास्तवही याच निवडणुकीतून समोर आले. आगामी महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून हा मतदार आणखी वाढवण्याची आणि पक्का करण्याची संधी भाजपला आहे. तीन पक्षांचे नेते, मंत्री, कार्यकर्ते, संस्थात्मक जाळे, ताब्यात असणारे प्रशासन आणि पूर्वापर असणारा मतदारांचा गठ्ठा असे असूनही महाविकास आघाडीला फार मोठे मताधिक्य मिळवता आले नाही. त्या तुलनेत भाजपने मिळवेली ७७ हजार ८०६ मते विशेष म्हणावी लागतील. भाजपने शहरामध्ये संघटनात्मक बदल केले आणि संघटनात्मक बाबींवर प्रयत्न केले तर आजचा पराभव ही भविष्यातील विजयाची नांदी ठरू शकेल.

चंद्रकांत पाटील यांची विधाने

भाजपचे तीन लाख कार्यकर्ते आणणार, या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानाने ही निवडणूक कोल्हापूरचा स्वाभिमान या मुद्याकडे वळविण्यात विरोधकांना यश आले. चंद्रकांत पाटील यांनी ‘ईडी’बाबत केलेल्या विधानाचा विपर्यास झाला, त्याचाही लाभ विरोधकांना मिळाला. कोल्हापूरची निवडणूक किती संवेदनशील आहे, याची जाणीवही चंद्रकांत पाटील यांना झाली असावी. मात्र, आता वेळ गेली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com