परराज्यातील वाहतूक खर्चिक

परवडणारा व्यवसायात टिकतो; खर्च न परवडणाऱ्यांची वाढती संख्या चिंतेचा विषय
परराज्यातील वाहतूक खर्चिक

कोल्हापूर : कागलमध्ये साखरेचा माल भरून ट्रक अहमदाबादला निघाला. तीन दिवसांनी अहमदाबादला पोहोचला. माल उतरून पुन्हा तीन दिवसांनी ट्रक परत कोल्हापुरात आला. ४८ हजार रुपयांचे भाडे मिळाले. जमा-खर्चाचा अंदाज घेता सगळा खर्च जाऊन तीन हजार रुपये शिल्लक राहिले. येताना भाडे मिळाले; पण तीही जेमतेम रक्कम होती. त्यातून दीड-दोन हजार रुपये मिळाले. असे सरासरी चार ते पाच हजार रुपये मिळाले. वाहतूक काळातील वाढत्या खर्चाच्या बोजात ट्रकमालक अक्षरशः घाईला येतो. ज्याला खर्च परवडतो, तो व्यवसायात टिकतो. ज्याला खर्च परवडत नाही, तो बरबाद होतो. अशांची वाढती संख्या माल वाहतुकीच्या क्षेत्रात चिंतेचा विषय बनली आहे.

मध्यंतरीच्या काळात खासगी फायनान्स कंपन्यांनी मोजक्या कागदपत्रांवर झटपट कर्ज मंजुरीचा धडाका लावला. त्यामुळे अनेक बेरोजगारांनी केवळ अवजड वाहन चालवण्याचा परवाना दाखवत कर्जे मिळवली. ट्रक घेत माल वाहतूक व्यवसाय सुरू केला. डिझेलचे भाव दरवर्षी वाढतात. सध्या ९३ रुपये लिटर डिझेल झाले. एक ट्रक तीन किलोमीटर सरासरी ॲव्हरेज देतो.

पूर्वीपासून व्यवसाय करणाऱ्यांची मक्तेदारी असताना नव्या ट्रक मालकांची भर पडली. २०१० ते २०१७ या काळात स्पर्धा वाढली. सहाचाकी, आठचाकी ट्रक स्थानिक माल वाहतूक करू लागले, तर १२-१४-१६ चाकी अवजड वाहनांनी परराज्यात माल वाहतूक सुरू केली.

कोल्हापुरातून शेतीमाल, साखर, गूळ गुजरातला जातो. औद्योगिक साहित्य उत्तर व दक्षिण भारतात जाते. त्यासाठी ट्रकला भाडे मिळू लागले; मात्र लाईनवर प्रत्यक्ष माल वाहतूक सुरू झाली की, डिझेल खर्च, चालक व क्लिनर पगार व भत्ता, चेक पोस्ट, आरटीओ किंवा वाहतूक पोलिस, जागोजागी दोनशे रुपये पास, टोल कर असा खर्च करावा लागतो.

ही रक्कम भाड्यातून वजा केल्यास नफा जेमतेम तीन ते पाच हजार रुपयांत शिल्लक राहतो. यात गाडीचे टायर झिजले किंवा दुरुस्ती निघाली की, दहा-पंधरा दिवस ट्रक थांबून राहतो किंवा भाडे मिळाले नाही, तर ट्रक दोन-चार दिवस थांबून राहतो. या काळात चालक-वाहकांचे वेतन, भत्ता द्यावा लागतो. येथे नुकसान होते. वर्षात दोन-चार वेळा असे घडले की, कर्जाचे हप्ते थकतात. फायनान्स कंपन्या ट्रक ओढून नेतात. येथून माल वाहतूकदार कंगाल होत आहे.

कोल्हापूर-अहमदाबाद १४ चाकी ट्रक फेरी

  • भाडे ४८,००० रुपये

  • डिझेल ३१,०००

  • माल भरणे व उतरणे ३०००

  • क्लिनर, चालक भत्ता व वेतन १२००

  • टोल ६,३००

  • शासकीय यंत्रणांची अडवणूक २०००

  • मालकाचा नफा ४५००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com