समाईक सातबाराधारक शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

Farmers Await Loan Kolhapur Marathi News
Farmers Await Loan Kolhapur Marathi News

कोल्हापूर ः जमिनीचा कागदोपत्री मालक एक आणि कसणारा दुसराच अशा प्रकरणातील शेतकरी अजूनही महापुराच्या काळातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. पहिले कर्ज थकीत असल्याने या शेतकऱ्यांना खरीप हंगामातील कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत, त्यात कोरोनामुळे सहकार विभागाचे कामकाज ठप्प असल्याचा फटका या शेतकऱ्यांना बसणार आहे.

गेल्यावर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्याला अतिवृष्टी आणि महापुराचा तडाखा बसला. यात नदीकाठच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. अशा तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली होती. हेक्‍टरी दोन लाखांपर्यंतचे कर्ज या योजनेत माफ होणार होते. 

महापुराचे पाणी ओसरल्यानंतर या पिकांचे पंचनामे करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुंताशी क्षेत्रावर नाव एकाचे आणि प्रत्यक्ष कसणारा किंवा जमीन ताब्यात असलेला वेगळाच आहे. या पिकांचे पंचनामे करताना सातबारावर नाव असलेल्या व्यक्तीऐवजी कसणारा किंवा जमीन ताब्यात असलेल्या व्यक्तीचे नाव आले. कर्जमाफीची रक्कम जमा करताना मात्र मूळ मालकांचे पंचनाम्यात नाव नसल्याने ही रक्कम संबंधितांच्या नावावर वर्गच झाली नाही. जिल्ह्यात सुमारे अडीच ते तीन हजार शेतकऱ्यांबाबत हा प्रकार घडला आहे. 

कर्ज कसणाऱ्याच्या नावावर आहे, पण त्याला कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने पुढचे कर्ज मिळत नाही. एका एका गावांत शंभर-सव्वाशे शेतकऱ्यांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. जुने कर्ज फिटले नसल्याचे सांगून नवे कर्ज दिले जात नाही. 
अजूनही महापुराच्या कर्जमाफीतील 17 कोटी रुपये जिल्ह्यात शिल्लक आहेत. आतापर्यंत 90 हजार 126 शेतकऱ्यांना 276 कोटी 76 लाख रुपयांचे वाटप झाले आहे. 

लेखापरीक्षण सुरू- जिल्हा उपनिबंधक 
जिल्ह्यात सातबारा पत्रकी नाव नसल्याने महापुरातील कर्जमाफीचा लाभ न मिळालेले शेतकरी अडीच हजार आहेत. कोरोनामुळे याचे संस्थानिहाय लेखापरीक्षण झाले नव्हते. उद्यापासूनच हे काम सुरू होत असून लेखापरीक्षणानंतर संबंधित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com