
पतीच्या खून प्रकरणी पत्नी, मुलासह चौघांना अटक
सोनाळी : म्हलसवडे (ता. करवीर) येथे मुलाने दांडक्याने मारहाण करून व्यसनी वडीलांचा खून केला. भिकाजी आनंदा पाटील (वय ४७) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी संशयित मुलावर खूनाचा तर पत्नीसह अन्य तिघांना पुरावा नष्ट केल्याप्रकरणी करवीर पोलिस अटक केली. मुलगा सुभाष भिकाजी पाटील (वय २३), पत्नी - शारदा भिकाजी पाटील (वय ४२), सर्जेराव बापू पाटील (वय ३३) आणि हिंदुराव कृष्णात पाटील (वय ५१, सर्व रा. म्हालसवडे) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले, की म्हालसवडे (ता. करवीर) येथे भिकाजी आनंदा पाटील कुटुंबासोबत राहत होते. त्यांना दारूचे व्यसन होते. पाटील हे दारु पिऊन वरचेवर पत्नी संशयित शारदा आणि मुलगा सुभाष यांना त्रास देऊन भांडण करीत होते. पाटील यांच्या त्रासाला कंटाळून घरची मंडळी १२ एप्रिल रोजी रात्री उशिरा येथील मंदिराजवळ गेली होती. पाटील मध्यरात्री तेथे गेले. त्यांनी त्यांच्या मुलीला ओढत घरी नेण्याचा प्रयत्न केला. त्यांना सुभाषने लाकडी दांडक्याने मारले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार उघड होऊ नये यासाठी संशयित पत्नी शारदा, सर्जेराव आणि हिंदुराव या तिघांनी संगनमत करून रक्ताचे जमिनीवर पडलेले डाग पाणी मारून धुऊन पुसून काढले. हा प्रकार कोणालाही न सांगता गावी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. लगेच दुसऱ्यादिवशी रक्षाविसर्जन करून पुरावा नष्ट केला.
दरम्यान करवीर पोलिस ठाण्यात यासंबधीचा एक निनावी अर्ज आला होता. त्याची चौकशी करताना हा प्रकार उघड झाला. त्यानुसार खून व पुरवा नष्ट केल्याप्रकरणी चौघा संशयितांवर गुन्हा नोंद करण्यात आला. न्यायालयाने त्या चौघांना ९ मे पर्यंत कोठडी सुनावली असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी गोकुल राज जी, सहायक पोलिस निरीक्षक सूरज बनसोडे आणि अमंलदार सुभाष सरवडेकर यांनी केली.
Web Title: Four Arrested Husband Murder Case Incident Mhalaswade Anonymous Letter Attempts Destroy Evidence Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..