गडहिंग्लज : प्रशासकांनी बोलावलेली सभा बेकायदा

 मागणी जनता दल व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली आहे.
मागणी जनता दल व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली आहे. sakal

गडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या प्रशासकांनी कारखाना चालवायला देण्याच्या एकाच विषयावर ११ जूनला बोलावलेली सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा बेकायदा असून, ही सभा तत्काळ रद्द करावी, अशी मागणी जनता दल व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली आहे.

यासंदर्भात तहसीलदार दिनेश पारगे, प्रशासकीय अध्यक्ष अरुण काकडे यांना निवेदन दिले आहे. सहकारी संस्था अधिनियमानुसार सभासदांतून नवीन संचालक मंडळाची निवड करणे व त्यांच्याकडे कारखाना सुपूर्द करण्याचे प्रशासकांचे प्रथम कर्तव्य आहे. त्या अनुषंगाने निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. यामुळे अलाहिदा संचालक मंडळाची निवड होईल. अशा परिस्थितीत प्रशासकांनी कारखाना चालविण्यास देणे या एकाच विषयावर विशेष सभा बोलावली. ही सभा मूलत: बेकायदेशीर व रद्दबातल स्वरूपाची आहे. त्यामागील प्रशासकांचा हेतू स्वच्छ दिसत नाही. त्यांनी राजकीय दबावाला बळी पडून विशेष सभा बोलवल्याचा आरोपही केला आहे.

कारखाना व अर्कशाळा सहयोग, भाडे, भागीदारी, बीओटी तत्त्वावर चालविण्यास देण्याबाबतचा विषय हा बेकायदेशीर व सभासदांवर अन्याय करणारा आहे. वास्तविक, सभेपुढे कारखाना स्वबळावर चालविणे, त्यासाठी आवश्यक तरतुदी करणे, कर्ज मागणी करणे किंवा चालविणेस देणे अशा पर्यायांचा विषय आवश्यक होता. परंतु, प्रशासकांनी केवळ राजकीय दबावाला बळी पडून केवळ कारखाना चालविण्यास देण्याचाच विषय घेतला. त्यांची ही कृती चुकीची, अधिकारबाह्य व बेकायदा असून, कारखान्याच्या उपविधीतील तरतुदीच्या विरुद्ध ही कृती आहे. यामुळे ही विशेष सभा घेण्यासाठी जाहीर केलेली नोटीस मागे घेऊन सभा रद्द करण्याची मागणी आहे.

निवेदनावर कारखान्याचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांच्यासह माजी संचालक अमरसिंह चव्हाण, बाळकृष्ण परीट, संभाजी नाईक, बाळासाहेब मोरे, बाळेश नाईक, रामाप्पा करिगार, जयकुमार मुन्नोळी, उदय कदम, महाबळेश्‍वर चौगुले, श्रीपती कदम, बाबूराव कांबळे, शंकर पाटील आदींच्या सह्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com