गडहिंग्लज तालुक्‍यात निर्मनुष्य रस्ते, ओस पेठा"

Gadhinglaj Taluka Experience Silence Because Of Curfew Kolhapur Marathi News
Gadhinglaj Taluka Experience Silence Because Of Curfew Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : इतना सन्नाटा क्‍यूँ हे भाई. शोले चित्रपटातील हा प्रसिद्ध संवाद. शांतता, शुकशुकाटाचे वर्णन करण्यासाठी आजवर तो अनेकांच्या तोंडी शोभून दिसलाही असले. पण, आज गडहिंग्लज तालुक्‍यातील परिस्थिती त्याही पलिकडची होती. सन्नाटा क्‍यूँ है, हे विचारण्यासाठी आणि त्याचे उत्तर देण्यासाठीही कोणी रस्त्यावर नव्हते. कारण प्रत्येकालाच माहित होते, आज जनता कर्फ्यू आहे. त्यामुळे ये पब्लिक है सब जानती है, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी लोकांनी स्वयंशिस्त घालून घेत जनता कफ्यूला साथ दिल्याचे दिसून आले. परिणामी, आज दिवसभर शहरासह गावगाडा पूर्णपणे थांबला होता. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला वेळीच अटकाव घालणे गरजेचे आहे. त्यासाठी शासन पातळीवरून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. केवळ कागदावर नियोजन न करता त्याची काटेकोरपणे अंमलबजावणीही केली जात आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन आज जनता कर्फ्यूची हाक देण्यात आली होती. या जीवघेण्या विषाणूला रोखण्यासाठी थेट जनतेलाच साद घातली होती. सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. 

लोकांनीही जनता कर्फ्यूला मनापासून साथ दिल्याचे दिसून आले. शहरात नेहमी गजबजलेले असणारे दसरा चौक, वीरशैव चौक, नेहरु चौक, शिवाजी चौकासह सर्व रस्त्यांवर शुकशुकाट होता. लोकांनी घराबाहेर पडणेच टाळल्याने हे वातावरण दिवसभर कायम होते. जनता कर्फ्यूची दोन दिवस आधीच कल्पना दिल्यामुळे लोकांनी गैरसोय टाळण्यासाठी जिवनावश्‍यक वस्तुंची आधीच खरेदी केली होती. शहरातील रस्त्यावर ना एक व्यक्ती दिसत होती ना एखादी गाडी. सर्वत्र पसरली होती ती केवळ निरव शांतता. 

शहरातील परिस्थितीच ग्रामीण भागातही होती. ग्रामपंचायतींमार्फत शनिवारी (ता.21) रात्री आणि आज (रविवारी) पहाटे संस्कारवाहिनीवरुन जनता कर्फ्यूबाबतच्या सूचना देण्यात आल्या. त्याचा चांगला परिणाम दिसून आला. ग्रामीण भागातील लोकांनीही घराबाहेर पडणे टाळले. अगदी अपवाद वगळता शेजारी-पाजारी जाणेही टाळले होते. सकाळच्या सत्रात जनावरांच्या वैरणीसाठी जाणारे काही लोक दिसून आले. अन्य कामांना मात्र त्यांनी आजच्या दिवसापुरती तिलांजली दिल्याचे दिसून येत होते. यातून गावगाडाच थांबल्याचे दिसून आले. 

दूध संकलनाची वेळ बदलली... 
शेतीपुरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गडहिंग्लज तालुक्‍यात गोकुळसह अन्य खासगी दूध संघांमार्फत दूध संकलन केले जाते. जनता कर्फ्यूच्या पार्श्‍वभूमीवर दूध संघांनी आज संकलनाची वेळ बदलली होती. गावागावात आज सकाळी एक तास आधी दूध संकलन करण्यात आले. तर सायंकाळचे दूध संकलन एक तास उशीरा केले. त्यामुळे दुध घालण्यासाठी आणि घेण्यासाठी होणारी गर्दी जनता कर्फ्यूच्या काळात टळली. 

सोशल मिडीयावर प्रतिबिंब... 
नोकरी-व्यवसायामुळे रोज घराबाहेर असणाऱ्या लोकांना आज जनता कर्फ्यूमुळे घरात थांबणे बंधणकारक झाले. रोज कामात जाणारा वेळ आज घालवायचा कसा, हा प्रश्‍न त्यांच्यासमोर होता. त्याचे प्रतिबिंब सोशल मिडीयावर उमटल्याचे दिसून आले. सर्वसाधारणपणे सकाळी दहा ते सायंकाळी सहा या कालावधीत सोशल मिडीयावरील मेसेजचे प्रमाण कमी असते. आजचा दिवस त्याला अपवाद ठरला. आज दिवसभर सोशल मिडीयाही हाऊसफुल्ल होता. सहाजिकच त्यात कोरोनासंदर्भातील मेसेजची संख्या अधिक होती. 

कंटाळा आला म्हणून... 
पोलिसांनी दसरा चौकात पोलिस बंदोबस्त ठेवला होता. अपवादाने रस्त्यावर दिसणाऱ्यांचीही चौकशी केली जात होती. सकाळी साडेदहाच्या सुमारास या परिसरात दोघे जण फिरताना पोलिसांना आढळले. पोलिसांनी हटकल्यानंतर कंटाळा आला म्हणून बाहेर आल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी 'त्या' दोघांनाही ताब्यात घेतले. काही काळानंतर दोघांनाही सोडून देण्यात आले. 

पोलिसांकडून खबरदारी... 
जनता कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी पोलिस प्रशासनाने खबरदारी बाळगली होती. शहरासह तालुक्‍यातील मोठ्या गावामध्ये पोलिस बंदोबस्त ठेवला होता. शहरात काळभैरी रोड, दसरा चौक, वीरशैव चौक, आजरा रोड या ठिकाणी बॅरेकेटींग उभारण्यात आली होती. कोणी घराबाहेर पडणार नाही याची दक्षता घेतली जात होती. एक पोलिस उपअधीक्षक, दोन पोलिस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलिस निरीक्षक, एक पोलिस उपनिरीक्षक, 100 पोलिस कर्मचाऱ्यांसह एक स्ट्रायकिंग फोर्स बंदोबस्ताला होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com