esakal | गोकुळ रणांगण; करवीर तालुक्‍यावर ठरणार सत्तेचा कौल!
sakal

बोलून बातमी शोधा

गोकुळ रणांगण; करवीर तालुक्‍यावर ठरणार सत्तेचा कौल!

गोकुळ रणांगण; करवीर तालुक्‍यावर ठरणार सत्तेचा कौल!

sakal_logo
By
कुंडलिक पाटील

गोकुळ निवडणुकीसाठी दोन्ही आघाड्यांचे उमेदवार जाहीर झाले आहेत. मंत्री, खासदार आमदार आणि माजी आमदारांच्यादृष्टीने प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत उमेदवारी न मिळालेल्यांची नाराजी कळीचा मुद्दा असणार आहे. त्यात भविष्यातील राजकारण, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीची मोर्चेबांधणीही या निवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर तालुक्‍याच्या राजकारणावर उमेदवारी निवडीचा आणि सद्यःस्थितीत कोण कोणासोबत राहील, याचा आढावा घेणारी तालुका वार्तापत्रे आजपासून...

कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीने करवीर तालुक्‍यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तालुक्‍यात सर्वाधिक सुमारे ६५९ ठराव असल्याने करवीर तालुका निवडणुकीत केंद्रस्थानी असणार असून किंबहुना गोकुळच्या सत्तेचा कौल ठरणार आहे. आमदार पी. एन. पाटील हे सत्ताधारी गटाचे नेते असल्यामुळे, त्यांच्या नेतृत्वाचा फायदा सत्ताधारी गटाला होणार आहे. पालकमंत्री सतेज पाटील व माजी आमदार चंद्रदीप नरके यांची सत्ताधारी गटाला थोपविण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. यामुळे दोन्ही पॅनेलकडून सर्वाधिक प्रत्येकी पाच असे एकास एक उमेदवार दिले आहेत.

सत्ताधारी गटाकडून राजर्षी शाहू आघाडीतून विद्यमान संचालक बाळासाहेब खाडे (सांगरूळ), सत्यजित पाटील (कसबा बीड), उदय पाटील (सडोली खालसा) यांच्यासह प्रताप पाटील (कावणे), रणजित पाटील (साबळेवाडी) या दोन चेहऱ्यांना संधी दिली आहे. आमदार पाटील यांनी जुन्या सांगरूळमधून तीन विद्यमान संचालक दिल्याने ताकद निर्माण झाली आहे. नवीन करवीरमधून नवीन उमेदवार दिला आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या गटाचे दक्षिणमधून एक असे ताकदीचे उमेदवार देऊन समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.

गतवेळी सत्ताधारी गटात असणारे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीत सामील झाल्याने त्यांच्यावर मदार आली आहे. या आघाडीतून पालकमंत्री सतेज पाटील गटाचे प्रकाश पाटील (नेर्ली), बाबासाहेब चौगले (केर्ले), शशिकांत पाटील (चुयेकर), तर नरके गटाचे एस. आर. पाटील (चिखली) असे तोडीसतोड उमेदवार दिले आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर थेट प्रचार सुरू झाला आहे. ठरावधारकांना लॉकडाउनकाळात सुगीचे दिवस आले आहेत. असे चित्र असले तरी पैशापेक्षा संघ टिकला पाहिजे, या लोकभावनेचा कौल कानावर पडत आहे.

नाराजीचा फायदा कोणाला?

गोकुळ कृती समितीद्वारे सत्ताधाऱ्यांविरुद्ध आवाज उठवणारे ‘कुंभी’चे संचालक किशोर पाटील, शेकापचे बाबासाहेब देवकर यांच्यासह अन्य तीन कार्यकर्ते इच्छुक होते. त्यांना डावलल्याने या गटात अस्वस्थता आहे. माजी आमदार संपतराव पवार पाटील यांना एकही जागा न दिल्याने त्यांच्या भूमिकेला महत्त्व आहे.

‘३, १३, २३’

पारदर्शी कारभारामुळेच ३, १३, २३ तारखेच्या दूध बिलात खंड पडू दिला नसल्याचा व राज्यातील पहिल्या क्रमांकाचा संघ असल्याचा दावा सत्ताधारी करीत आहेत. ‘गोकुळ’ला अमूलसारखा संघ बनविण्याचा दावा विरोधी गटाने केला आहे.

loading image