अडीच एकर द्राक्षबागेवर ऐन हंगामात फिरवली कुऱ्हाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

grapes garden destroyed danoli kolhapur

बागायतदार अनिल मोटकेंचा निर्णय; प्रतिकूल हवामानामुळे ऐन हंगामात तोडली झाडे 

अडीच एकर द्राक्षबागेवर ऐन हंगामात फिरवली कुऱ्हाड

sakal_logo
By
युवराज पाटील

दानोळी (कोल्हापूर) : तीन वर्षांपासून सातत्याने प्रतिकूल हवामान, रोगांचा प्रादुर्भाव, बेदाण्याला कमी दर, शासनाचे चुकीचे धोरण आदी कारणाला वैतागून दानोळी येथील अनिल बापूसो मोटके यांनी अडीच एकर द्राक्षबागेवर ऐन हंगामात कुऱ्हाड फिरवली आहे. तीन वर्षांपासून सातत्याने नुकसानीत जाणाऱ्या बागेमुळे बाग तोडली आहे.

२०१८ चा हंगाम आगाप छाटणी घेऊनही दावण्याच्या तावडीत सापडला. २०१९ चा हंगाम महापूर व अतिपावसाने नुकसानीत आला. यंदा एक महिना उशिरा छाटणी घेऊनही परतीच्या पावसाने तडाखा दिला. फ्लावरिंग स्टेजला असणारी द्राक्षे कुजली गेली. सरासरी अडीच एकरामध्ये ३० टन निघणारा माल २०१८ ला अवघा अडीच टन निघाला. गेल्यावर्षी तर फक्त १७० किलो निघाला. यावर्षीही तशीच स्थिती राहिल्याने वैतागून बाग तोडली.
तीन वर्षांत ११ लाख ८७ हजार रुपये खर्च केला.

उत्पन्न मात्र १ लाख ६४ हजार रुपये मिळाले. १५ वर्षांपूर्वी बेदाण्याला सरासरी १५० रुपयांपेक्षा अधिक दर होता. सध्या सरासरी १३० रुपये दर आहे. उत्पादन खर्च मात्र चार ते पाच पटीने वाढला आहे. त्यामुळे द्राक्ष शेती नुकसानीची ठरत आहे. बेदाण्याला १२० रुपये दर म्हणजे प्रतिकिलो द्राक्षाला २५ रुपये दर. याच्यापेक्षा भाजीपाल्याला दर जास्त आहे. वर्षभराचे एकच पीक असून लाखो रुपये खर्चून एवढेच उत्पन्न मिळणे म्हणजे नुकसानीची शेती ठरत आहे. बागेसाठी काढलेले कर्जही ३ लाखांवर असल्याने कर्जमाफीतून वगळले आहे. परतीच्या पावसाने पंचनामे करताना काढणीयोग्य माल असेल तरच पंचनाम्याचे आदेश असल्याचे सांगून पंचनामे नाहीत.

हेही वाचा- Success Story : देशातील पहिली पाण्यावर तरंगती शेती: दोन उच्चशिक्षित तरुणांनी केला प्रयोग -

उत्पादन खर्च चौपट, दर तेवढाच
सतरा वर्षांत द्राक्षबागेचा उत्पादन खर्च चौपट झाला आहे. खत, औषधे, मजुरी व मशागतीच्या दरामध्ये भरमसाट वाढ झाली आहे. बेदाण्याचा दर मात्र दीडशेवरून १३० रुपयांवर आला आहे.

१४ वर्षांपासून द्राक्ष बाग आहे. तीन वर्षांपासून बाग नुकसानीत आहे. आतापर्यंत बागेवर लाखो रुपये खर्च झाले. परतीच्या पावसाच्या तडाख्याने यंदाची बागही वाया गेली होती. राहिलेले घड टिकवणे आणि पुढील खर्च सोसवेना म्हणून बागच तोडण्याचा निर्णय घेतला.
- अनिल मोटके, द्राक्षबागायतदार

संपादन - अर्चना बनगे

loading image
go to top