esakal | आरोग्य विमा उतरवा; पश्चात्ताप टाळा

बोलून बातमी शोधा

आरोग्य विमा उतरवा; पश्चात्ताप टाळा
आरोग्य विमा उतरवा; पश्चात्ताप टाळा
sakal_logo
By
लुमाकांत नलवडे

आरोग्य विमा किती आवश्‍यक आहे, हे आजारी पडल्यानंतर कळते. तेव्हा किती रुपयांचा विमा होऊ शकतो, वार्षिक हप्ता किती असेल, मला परवडेल काय? अशा शंका उपस्थित होतात. मात्र, विमा घेण्याची वेळ टळलेली असते. सर्वसामान्यांना परवडणारा वार्षिक हप्ताही आहे. केवळ आपली मानसिकता बदलणे आवश्‍यक आहे. नेमका विमा काय असतो, त्याचे फायदे आणि सावधगिरी काय बाळगावी, याबद्दल थोडक्‍यात...

भविष्याचा विचार करा

जिल्ह्यात सुमारे पंचवीसहून अधिक कंपन्यांकडून आरोग्य विमा दिला जातो. अनेक बड्या रुग्णालयांत याची यादीच दर्शनी भागात प्रसिद्ध केली जाते. विम्यासंदर्भात आवश्‍यक कागदपत्रांची माहिती व त्याची पूर्तता करण्यासाठी स्वतंत्र कक्ष आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने आर्थिक कुवतीनुसार आरोग्य विमा करून घ्यावा. अनेक आरोग्य विम्यात नोंदणी केलेल्या दिवसापासून ठराविक कालावधींसाठी (साधारण तीन महिने) त्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे भविष्याचा विचार करूनच विमा उतरविणे आवश्‍यक असते.

का घ्यावा?

आरोग्य विमा असल्यामुळे तुम्हाला सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्येही कॅशलेस उपचार मिळू शकतात. यावेळी तुमच्या कुटुंबीयांकडून जेवणाचा डबा देण्यापासून ते बिलाच्या आकड्यापर्यंत चिंता नसते. वेळीच योग्य उपचार होणे शक्‍य होते. विम्यासाठी आवश्‍यक सर्व कागदपत्रे पूर्ण करण्याची जबाबदारी हॉस्पिटल घेते. अनेक वेळा आरोग्य विम्यासाठी जितका खर्च केला आहे, त्यापेक्षा दहापटीने अधिक खर्च हॉस्पिटलच्या बिलासाठी होतो. अनेक वेळा तो संपूर्ण मोफत किंवा ८०-९० टक्‍क्‍यांपर्यंत विमा कंपनी आदा करते. यावेळी मिळालेले समाधान हे तुम्ही आजारी पडण्यापूर्वी उतरवलेल्या आरोग्य विम्यामुळे मिळते.

कसा उतरवावा?

अनेक बॅंकांच्या माध्यमातून आरोग्य विमा उतरविला जातो. त्याचे वार्षिक हप्तेही तुमच्या बॅंक अकाऊंटमधून भरले जातात. एजंटाकडून विमा उतरविताना त्याची अधिकृतता तपासून पाहावी. शक्‍यतो ओळखीच्या व्यक्तींकडून किंवा विमा कार्यालयात उतरवावा. विमा उतरवताना त्यासंदर्भातील छुपी माहिती किंवा सर्व शंका विचारून घ्याव्यात. शक्‍यतो रुग्णालयात अपडेट प्रिंटेड कॉपी मागून घेणे उचित ठरते. त्यानुसार आजारी पडल्यास त्याच रुग्णालयात दाखल झाल्यास कॅशलेस योजनेचा लाभ मिळतो; अन्यथा परतावा घ्यावा लागतो.

वय आणि हप्ता यांची सांगड

आरोग्य विमा हा तुमचे वय आणि कव्हर याची सांगड घालून हप्ता ठरविला जातो. प्रत्येक विमा कंपनीत सध्यातरी याच पद्धतीने नियोजन आहे. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींच्या वयावर आरोग्य विम्याचा हप्ता ठरतो. तसेच तुम्हाला किती रुपयांचा कव्हर पाहिजे यावरही हप्ता अवलंबून असतो. शासनाच्याही आरोग्य विमा कंपन्या आहेत. काही आरोग्य विम्यामध्ये वय आणि हप्ता यांच्यात तफावत असते. त्यामुळे विमा कंपन्यांकडून हप्ता आणि लाभ यांची घातलेली सांगड पाहावी.

देशात करा, विदेशात लाभ घ्या

आपल्या देशात आरोग्य विमा उतरवला असला तरीही परदेशातील उपचारासाठी तुम्ही लाभार्थी ठरू शकता. ही योजना आरोग्य विमा उतरविणाऱ्या कंपन्यांकडे आहे. त्याची मागणी ग्राहकाने करावी. या विम्यात तुम्हाला देशात आणि परदेशातही उपचार घेता येतात. त्याचा खर्च विमा कंपनी करते. मात्र, या विम्यासाठी हप्ता आणि विम्याची रक्कम अधिक असते.

पन्नाशीपूर्वीच घेतल्याचे फायदे

पन्नास वर्षाच्या आतील व्यक्तींना शक्‍यतो कोणत्याही मेडिकल चाचणीशिवाय विमा दिला जातो. मात्र, त्यानंतर वैद्यकीय तपासण्या करून नोंदणी केली जाते. त्यामुळे शक्‍यतो पन्नाशीच्या आताच विमा उतरवा. कमीत कमी सलग तीन वर्षे विम्याच्या हप्त्यांत खंड पाडू नका, म्हणजे नंतर कोणत्याही आजारावर विम्याच्या माध्यमातून उपचार घेता येतात.

ही घ्या काळजी...

  • विमा उतरवताना रुग्णालयांची अपडेट यादी घ्या

  • बेडची व्यवस्था जनरल, स्पेशल, एसी हे विचारून घ्या

  • विमा उतरवल्यानंतर परतावा घ्यायची पद्धत विचारून घ्या

  • शक्‍यतो अधिकृत व्यक्ती, कार्यालयातून विमा उतरवा

  • कोणत्या कारणामुळे लाभ मिळणार नाही याचीही माहिती घ्या

  • परताव्यासाठी ॲडमिट झाल्यानंतर किती वेळात संबंधितांना कळवावे लागते याची माहिती घ्या

  • कॅशलेससाठी काय कागदपत्रे सोबत ठेवावी लागतात याची माहिती घ्या

  • विमा लाभ घेण्यासाठी कोणत्या क्रमांकावर संपर्क साधायचा हे विचारा

  • संपर्काचा तो क्रमांक डायल करून सुरू आहे का पाहा

"ग्रामीण भागातील उत्पन्न कमी असलेल्या कुटुंबासाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडून खास कमी हप्त्याचा विमा आहे. ही कंपनी शासनाकडून चालविली जाते. यामध्ये केवळ सहाशे रुपयांच्या वार्षिक हप्त्यामध्ये सुमारे तीस हजार रुपयांचा कव्हर (क्‍लेम) मिळू शकतो. काही वेळा दहा-पंधरा हजार रुपयांचे बिल झाले तर औषधे आणि त्याच्या आजारानुसार पन्नास ते ९० टक्केपर्यंत परतावाही योजनेत दिला जातो."

- रमेश रांजणे, विमा प्रतिनिधी