Ichalkaranji crime : इचलकरंजीत तरुणीवर खुनी हल्ला Ichalkaranji crime Murderous attack girl young man attacked | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 attack girl young man

Ichalkaranji crime : इचलकरंजीत तरुणीवर खुनी हल्ला

इचलकरंजी : प्रेमसंबंधास नकार दिल्याने एका तरुणाने आज एका युवतीवर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात तरुणीच्या हाताची बोटे तुटली आहेत. या खुनी हल्ल्यात संबंधित युवती गंभीर जखमी झाली आहे. तिच्या हात, मान व डोक्यावर कोयत्याचे जबरी घाव आहेत. आयजीएम रुग्णालयात प्राथमिक उपचार करून तिला सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले. हल्लेखोर पसार आहे.

या बाबत शिवाजीनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः वर्षभरापूर्वी हल्लेखोर तरुणाचा अन्य एका मुलीशी विवाह झाला. त्यामुळे हल्ला झालेल्या तरुणीने त्याच्याशी संबंध तोडले. यावरून त्यांचे वाद सुरू होते. तो जबरदस्तीने संबंधांसाठी प्रयत्न करत होता. तिने पोलिस ठाण्यात तक्रार करतो, असे सांगितल्यावरही त्याने तिच्यावर दादागिरी केली. गेल्या पंधरा दिवसांपासून तो तिच्या घरी जाऊन वाद घालत होता. त्याने आज रात्री साडेनऊला तिच्या घरासमोर येऊन तिच्याशी वाद घालत मारहाण केली.

वाद विकोपाला पोहोचल्यानंतर त्याने थेट खुनी हल्ला चढवला. त्याने तिच्या डोक्यावर व मानेवर कोयत्याने एकापाठोपाठ एक वार करीत तिला खाली पाडले. त्यानंतर दोन्ही हातावर वार करत बोटे तोडली. आरडाओरडा ऐकून एकाने वाद रोखण्याचा प्रयत्न केला.

नागरिक जमताच हल्लेखोर पसार झाला. तरुणीला स्थानिकांनी आयजीएम रुग्णालयात दाखल केले. पंचनाम्‍यानंतर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांनी घटनास्थळी भेट दिली. हल्लेखोराचे नाव निष्पन्न झाले.