
कोल्हापूर : काँग्रेस, शिवसेनेत मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस व शिवसेनेत मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता आहे. शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीच तशी मागणी राज्य पातळीवरील नेत्यांकडे लावून धरली आहे. एक-दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिष्टमंडळाकडून भेट घेण्याची तयारी सुरू आहे.
हेही वाचा: Young weather champion : प्राजक्ता कोळी साधणार तरुणांशी संवाद
शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याबरोबरच त्या जिंकण्यासाठी आवाहन केले आहे. ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे उत्तरमधून लढण्याच्या माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मागणीला पाठबळ मिळाले आहे.
२००४ चा अपवाद वगळता १९९० पासून ते २०१९ पर्यंत कोल्हापूर उत्तर मतदारसंघ शिवसेनचा बालेकिल्ला राहिला. शिवसनेने १९९० मध्ये मतदारसंघ ताब्यात घेतला. त्यावेळी कै. दिलीप देसाई शिवसेनेचे पहिले आमदार ठरले. त्यानंतर ९५ व ९९ च्या निवडणुकीत हा बालेकिल्ला माजी आमदार सुरेश साळोखे यांनी शाबूत ठेवला. २००४ मध्ये माजी आमदार मालोजीराजे यांनी शिवसेनेच्या ताब्यातून हा मतदार संघ काँग्रेसला मिळवून दिला. २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत क्षीरसागर यांनी त्यांचा पराभव केला. २०१४ ला क्षीरसागर हेच आमदार राहिले. २०१९ मध्ये मात्र काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.
हेही वाचा: राजकारणात तू कधी उतरणार? बहिणीसाठी काँग्रेसचा प्रचार करणाऱ्या सोनू सूदने दिलं उत्तर
कै. जाधव यांचे निधन झाल्याने उत्तरच्या पोटनिवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. काँग्रेसकडून कै. जाधव यांच्या पत्नी श्रीमती जयश्री यांची उमेदवारी निश्चित आहे. दुसरीकडे क्षीरसागर यांनीही तयारी सुरू केली आहे. राज्यात शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार आहे. ‘उत्तर’ची जागा काँग्रेसची असल्याने शिवसेनेने ही निवडणूक लढवू नये, यासाठी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यावर राज्य पातळीवरील सेना नेत्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. दोन दिवसांत शिष्टमंडळासह क्षीरसागर मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यानंतरच शिवसेनेची भूमिका स्पष्ट होईल, तथापि, मैत्रीपूर्ण लढतीसाठी परवानगी मिळावी, असा दबाव शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाकडून सुरू आहे.
हेही वाचा: स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली तरी आपण जातव्यवस्थेच्या कचाट्यातच: हायकोर्ट
...तर तिरंगी लढत
भाजपकडूनही निवडणूक लढण्याची तयारी सुरू आहे. राज्यात झालेल्या दोन्हीही पोट निवडणुकांत भाजपने उमेदवार उभे केले आहेत. यापैकी पंढरपूरची जागा भाजपने जिंकली. त्याच धर्तीवर ही जागाही लढवण्याचे भाजपचे निश्चित आहे. भाजप रिंगणात उतरले आणि शिवसेनेने मैत्रीपूर्ण लढत म्हणून शड्डू ठोकला तर ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे.
विकासकामांचा धडाका
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून क्षीरसागर यांनी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून लढण्यास तयार असल्याचे दाखवून दिले आहे. आज पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन कै. जाधव यांच्या पत्नी श्रीमती जयश्री यांच्या उपस्थित झाले. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासकामांचा धडाका सुरू आहे.
Web Title: Indications Of Friendly Struggle Congress Shiv Sena
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..