esakal | प्रथम मानाची सासनकाठी प्लेगच्या साथीतही आली जोतिबा डोंगरावर

बोलून बातमी शोधा

null

प्रथम मानाची सासनकाठी प्लेगच्या साथीतही आली जोतिबा डोंगरावर

sakal_logo
By
निवास मोटे

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जोतिबा चैत्र यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द झाली. दरवर्षी जोतिबा डोंगरावर वाजतगाजत येणाऱ्या सर्व सासनकाठ्या ज्या त्या गावात उभ्या आहेत. या सासनकाठ्यांचा प्रवास जोतिबा डोंगराच्या दिशेने झाला नाही. या मानाच्या ९६ सासनकाठ्यांचे स्थान मात्र भाविकांच्या मनात अबाधित आहे. चैत्र यात्रेत पिढ्या न्‌ पिढ्या येणाऱ्या प्रमुख सासनकाठ्या, त्यांची गुणवैशिष्ट्ये, धार्मिक आणि विशिष्ट परंपरा यांची माहिती आजपासून...

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : शंभर - सव्वाशे वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात प्लेगच्या साथीने थैमान घातले होते. परिणामी, जोतिबा डोंगरावर जोतिबाची चैत्र यात्राही रद्द झाली. असे असताना पाडळी (निनाम, जि. सातारा) येथील काही धाडसी ग्रामस्थ मात्र सासनकाठी घेऊन जोतिबा डोंगरावर आले आणि त्यांच्या सासनकाठीला पहिल्या क्रमांकाचा मान मिळाला.

चैत्र यात्रेत सामील होणाऱ्या मानाच्या ९६ सासनकाठ्यांच्या मिरवणुकीत सहभागी होण्याचा मान या गावास मिळाला. या निशाणाची नोंद कोल्हापूर तहसील व इतिहासकालीन ताम्रपटावर आहे. सुमारे ३० ते ३५ मीटर उंचीचे जाड निशाण, गुलाली फरारा व तीन चुनी तोरणे बांधलेले असते. कोल्हापूर-पुणे महामार्गावर सातारा तालुक्‍यातील नागठाणे गावापासून पाच किलोमीटरवर निसर्गरम्य परिसरात पाडळी (निनाम) हे गाव वसले आहे. गावचे वैशिष्ट्य म्हणजे काही ग्रामस्थ उपवास करून अनवाणी जोतिबा डोंगरावर येतात. या ग्रामस्थांच्या डोक्‍याला पांढरी टोपी, पांढरा शर्ट, पॅन्ट किंवा विजार असा पोशाख असतो. या सासनकाठीस मोठा मान असून जोतिबा डोंगराकडे येताना या काठीचे गावोगावी स्वागत होते.

नारळाची तोरणे बांधली जातात. नोटांची तोरणे बांधली जातात. पाणपीठ म्हणजे ज्वारी, शाळू भाजून, जात्यावर दळून केलेले पीठ उपवासासाठी ग्रामस्थ वापरतात. केवळ पाण्याबरोबर हे पीठ उपवास करणारे ग्रामस्थ खातात. भूक लागल्यास केवळ हे पीठ खाणे. तीन दिवस हा उपवास असतो. डोंगरापर्यंत येईपर्यंत अनेक ग्रामस्थांच्या पायाला फोड येतात; पण केवळ चांगभलंच्या जयघोषाने या ग्रामस्थांना ऊर्जा मिळते.

कोरोना काळात गेल्या वर्षी ४० ग्रामस्थांनी हा उपवास करून परंपरा जपली. दरवर्षी गुढीपाडव्यादिवशी जोतिबा डोंगर येथील पुजारी गजानन लादे व श्रीमती अक्काताई लादे या पाडळी गावास न चुकता जातात. ते पाडळी ग्रामस्थांना चैत्र यात्रा कधी होणार आहे, याची माहिती देऊन यात्रेचे निमंत्रण देतात. कोरोनाने थैमान घातल्याने गावातच सर्व धार्मिक विधी करावे लागले.

(क्रमशः)

"कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीही चैत्र यात्रा रद्द झाली. गेल्या वर्षीप्रमाणे आम्ही पाच लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी करणार आहोत. आमच्या गावची सासनकाठी पहिल्या क्रमांकाची आहे. तिला यात्रेत मान आहे. आमच्या या सासनकाठीचे येताना-जाताना गावोगावी भाविक मंडळी स्वागत करतात."

- डॉ. हणमंत ढाणे, अध्यक्ष, ज्योतिर्लिंग देवस्थान, पाडळी (निनाम) जि. सातारा