गोविंद पानसरे हत्याप्रकरणाची सुनावणी कोणत्या न्यायालयात चालणार? ATS ने स्पष्ट करण्याचे न्यायाधीशांचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Comrade Govind Pansare

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे हस्तांतरित केला आहे.

गोविंद पानसरे हत्याप्रकरणाची सुनावणी कोणत्या न्यायालयात चालणार?

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे (Comrade Govind Pansare) हत्येचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे (ATS) हस्तांतरित केला आहे. यासंबंधीची पुढील सुनावणी कोणत्या अधिकार क्षेत्रात असलेल्या न्यायालयात चालणार, याची स्पष्टता ‘एटीएस’च्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात उपस्थित राहून द्यावी, असे आदेश नुकतेच जिल्हा व सत्र न्यायालयाने दिले.

सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी बाजू मांडली. पुढील सुनावणी ६ सप्टेंबरला आहे. पानसरे हत्याप्रकरणी १२ संशयितांवर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी दोघांचा शोध सुरू आहे. दहा संशयितांवर दोष निश्चिती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, पानसरे कुटुंबीयांनी विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) तपास ‘एटीएस’कडे हस्तांतरित करावा, अशी मागणी उच्च न्यायालयात केली होती. उच्च न्यायालयाने (High Court) त्याला मंजुरी दिली. यासंबंधीची सुनावणी काल जिल्हा न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्या न्यायालयात झाली.

हेही वाचा: पक्ष सोडल्यास 20 कोटी, दुसरा नेता सोबत आणल्यास 25 कोटी; आप खासदाराचा गौप्यस्फोट

न्यायालयात दहाही संशयितांना पोलिस (Police) बंदोबस्तात हजर केले होते. यासंबंधीची पुढील सुनावणी एटीएसच्या अधिकार क्षेत्रातील न्यायालयात की कोल्हापूर अधिकार क्षेत्रातील न्यायालयात होईल, याबाबत शंका निर्माण झाली. याबाबत सरकार पक्षातर्फे न्यायालयात अर्ज सादर केला. न्यायालयाने तो मंजूर केला. न्यायालयाने एटीएसचे अतिरिक्त पोलिस अधीक्षकांना सहा सप्टेंबरला न्यायालयात हजर राहून न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाबतची शंका दूर करावी, असे आदेश दिले. संशयितांचे वकील समीर पटवर्धन यांनी न्यायालयात एसआयटी आणि एटीएसचे अधिकारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आणून दिले. सुनावणीवेळी मेघा पानसरे, दिलीप पवार उपस्थित होते. पुणे ते कोल्हापूर प्रवास करताना त्रास होतो. सुनावणीसाठी आल्यानंतर आपल्याला दोन ते तीन दिवस कोल्हापुरातच ठेवण्याची विनंती संशयित वीरेंद्रसिंह तावडेने (Virendra Singh Tawde) न्यायालयाकडे केली.

हेही वाचा: टीएमसी नेत्याच्या अडचणीत वाढ; अनुब्रता मंडल यांना 14 दिवसांची CBI कोठडी

Web Title: Judge Orders Ats In Comrade Govind Pansare Murder Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kolhapurhigh courtATS