Kolhapur : फुलेवाडी रिंगरोडवर अपघात : चालकाला नागरिकांची मारहाण मद्यधुंद ट्रकचालकाने दुचाकींना ठोकरले

Kolhapur Accident Phulewadi Ring Road
Kolhapur Accident Phulewadi Ring Road sakal

कोल्हापूर - मद्यधुंद ट्रकचालकाने रस्त्यावरील दुचाकींना धडक देऊन उडवल्याचा थरार आज रात्री नागरिकांनी अनुभवला. गगनबावडा महामार्गावरील कळे, फुलेवाडी येथे त्याने दुचाकींना धडक दिली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही; मात्र नागरिकांनी ट्रकचा पाठलाग करून त्या चालकाला पकडले आणि बेदम चोप दिला. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

शीतल काशिनाथ शिपुगडे (वय ३२, रा. बापट कॅम्प) असे ट्रकचालकाचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक नागरिक आणि पोलिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल हा राजापुरातून बांधकामासाठी वापरले जाणारे चिरे ट्रकमधून घेऊन कोल्हापूरला येत होता. कळे येथे त्याने एका धाब्यावर थांबून मद्यप्राशन केले.

त्याच अवस्थेत तो ट्रक चालवत कोल्हापूरच्या दिशेने निघाला. काही अंतर गेल्यावर त्याने रस्त्यातील दुचाकींना धडक दिली. या धडकेत दुचाकी काही अंतरावर जाऊन पडल्या. शीतलने याकडे दुर्लक्ष केले आणि तो तसाच पुढे निघून गेला. त्यानंतर फुलेवाडी येथे आल्यावरही त्याने आणखी काही दुचाकींना धडक दिली.

सुदैवाने दोन्ही धडकांमध्ये कोणीही जखमी झाले नाही; मात्र दुचाकींचे मोठे नुकसान झाले. शीतल तसाच पुढे निघून जात होता; मात्र पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्याला अडवले आणि ट्रकमधून बाहेर खेचले. त्यानंतर त्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. तेथील काही नागरिकांनी या घटनेची माहिती तत्काळ करवीर पोलिसांना दिली.

लगेचच करवीर पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी लोकांच्या तावडीतून चालकाला बाजूला केले. करवीर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या अपघातात जरी कोणी गंभीर जखमी झाले नसले तरी प्रत्यक्षात जो थरार परिसरातील लोकांनी अनुभवला, त्यामुळे या परिसरात घबराटीचे वातावरण आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com