esakal | कोल्हापूर - नवरात्रोत्सात अंबाबाईच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग कसे कराल? जाणून घ्या
sakal

बोलून बातमी शोधा

नवरात्रोत्सात अंबाबाईच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग कसे कराल?

दसऱ्याच्या दिवशी दसरा चौकात होणारा शाही दसरा सोहळा यंदाही रद्द केला

नवरात्रोत्सात अंबाबाईच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग कसे कराल?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाला गुरुवाकपासून प्रारंभ होणार आहे. यंदा नऊ दिवसच उत्सव रंगणार असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल. करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि जोतिबाचे दर्शन घेण्यासाठी ऑनलाईन बुकिंग आवश्यक असून, त्यासाठीच्या लिंक उद्या (६) सकाळी अकराला खुल्या होणार आहेत. दसऱ्याच्या दिवशी दसरा चौकात होणारा शाही दसरा सोहळा यंदाही रद्द केला असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार, सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.

ऑनलाईन बुकिंग असे ः

अंबाबाई व जोतिबा दर्शनासाठी अनुक्रमे www.mahalaxmikolhapur.com आणि www.shreejyotiba.com या संकेतस्थळांवर ई-पासची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. उद्या (ता. ६) सकाळी अकरापासून भाविकांना ऑनलाईन बुकिंग करता येईल. ई-दर्शन पाससाठी आधारकार्ड नंबर, ई-मेल ॲड्रेस व मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. एका वेळेला एका व्यक्तीसोबत कुटुंबातील जास्तीत जास्त तीन सदस्यांची नोंदणी करून ई-पास काढता येईल. बुकिंग झाल्यावर मोबाईल व मेलच्या माध्यमातून पीडीएफ स्वरूपात ई-पास क्यूआर कोडसह भाविकांना मिळेल. ई-पासचा आयडी नंबरचा एसएमएस मोबाईलवर येईल. भाविकांना दर्शनासाठी येताना हा ई-दर्शन पास किंवा ‘एसएमएस'द्वारे मिळालेला आयडी नंबर आणि आधारकार्ड असणे आवश्यक आहे.

हेही वाचा: पिवळ्याधमक फुलांनी बहरले सिंधुदुर्ग; 'तिळा'च्या शेतीने फुलली गावे

दृष्टिक्षेपात अंबाबाई दर्शन असे...

अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना शिवाजी चौक आणि एमएलजी हायस्कूलमार्गे दर्शन रांगेत प्रवेश असेल. ई-पासची नोंदणी तपासूनच दर्शन रांगेत प्रवेश दिला जाईल. या ठिकाणी चप्पल स्टॅंड, थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझरची सुविधा असेल. शिवाजी चौकातून भवानी मंडप कमानीपर्यंत स्त्री व पुरुष अशा स्वतंत्र रांगा असतील. भवानी मंडपातून पुढे या रांगा महिला व पुरुषांसाठीच्या स्वतंत्र दर्शन मंडपात प्रवेश करतील. पूर्व दरवाजातून मंदिरात आल्यावर पितळी उंबऱ्यापासून दर्शन घेतल्यावर दक्षिण दरवाजातून भाविकांना बाहेर पडता येईल. संपूर्ण दर्शन रांगेत सहा फूट सोशल डिस्टन्सचा नियम बंधनकारक असेल.

- ई-दर्शन पास पडताळणीसाठी नियोजित वेळेपूर्वी ३० मिनिटे अगोदर उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

- महाद्वाराच्या बाहेरून भाविकांना मुखदर्शनाची सुविधा असेल. त्यासाठी बिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वारापर्यंत महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा असतील. या रांगेतही सहा फूट सोशल डिस्टन्सचा नियम बंधनकारक असेल.

- ७ ते १५ ऑक्टोबरपर्यंत (१४ ऑक्टोबर वगळता) पहाटे पाच ते रात्री नऊपर्यंत दर्शन सुरू राहील. १४ ऑक्टोबरला सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत दर्शन सुरू राहील.

- शहरात ११ ठिकाणी एलईडी स्क्रीनची व्यवस्था असेल. त्यावरून देवीचे लाईव्ह दर्शन, पालखीचे लाईव्ह प्रसारण आणि कोरोना प्रतिबंधात्मक नियमांबाबतच्या सूचना दिल्या जातील.

- मंदिरात साडी, ओटी, नारळ, तेल किंवा पूजेचे कोणतेही साहित्य नेण्यासाठी मनाई असेल.

- प्रतितास ७०० भाविकांना दर्शन असेल. प्रत्येकाला मास्क बंधनकारक असेल. दहा वर्षांखालील व ६५ वर्षांवरील व्यक्ती, गर्भवती महिला, आजारी व्यक्तींना मंदिरात प्रवेश नसेल.

हेही वाचा: विदेशी भाजीपाल्यातून महिन्याला लाखोंची कमाई

loading image
go to top