कोल्‍हापूर : पन्हाळ्यावर सापडला आणखी एक तोफगोळा

पुसाटी बुरुज परिसरात तटबंदीत घुसलेला गोळा
 तोफगोळा
तोफगोळा sakal

पन्हाळा: गडाच्या पश्‍चिम बाजूच्या पुसाटी बुरुज परिसरातील स्वच्छता करताना तटबंदीत घुसलेला आणखी एक तोफगोळा आज राजा शिवछत्रपती परिवाराच्या कार्यकर्त्यांना सापडला. १ किलो ७३५ ग्रॅम वजनाचा हा धातूचा तोफगोळा परिवाराच्या कार्यकर्त्यांनी पुरातत्त्व विभागाकडे दिला.राजा शिवछत्रपती परिवार ही संस्था प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी किल्ले पन्हाळगड तसेच रांगणा किल्ल्याची स्वच्छता आणि संवर्धन करतात.

आज सकाळी साडेसात वाजता विविध गावांतील परिवाराचे १५१ युवक ४७ व्या मोहिमेसाठी बाजीप्रभू चौकात जमा झाले आणि संघप्रमुख उमेश तथा नाना डाकवे यांच्या नेतृत्वाखाली राजदिंडी ते पुसाटी बुरुज परिसरातील तटबंदीच्या स्वच्छतेला लागले. सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांना पुसाटी बुरूज परिसरात दगडात घुसलेला तोफगोळा आढळून आला. तो अलगदपणे काढून त्याची त्यांनी स्वच्छता केली. मसाई पठाराच्या बाजूने हा तोफगोळा डागल्याची शक्यता आहे. जागोजागी थोडीफार छिद्रे पडलेला हा लोखंडी तोफगोळा १ किलो ७३५ ग्रॅम वजनाचा आहे. श्री. डाकवे, विजय पाटील, विजय जगदाळे, मोहन कोकणे यांनी येथील पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे तो दिला. पर्णाल दुर्ग इतिहास संशोधक मंडळाचे प्रमुख संभाजी शेवाळे यांनी पन्हाळगडाविषयी माहिती दिली.

संशोधन होणे गरजेचे

गतवर्षी पावनगडावर फलक लावताना दगडी तोफगोळ्यांचा साठा सापडला होता, तर गेल्या आठवड्यात टोप, कासारवाडी येथील दुर्ग सेवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना तीन दरवाजा परिसरातील तटबंदीची स्वच्छता करताना अडीच किलो वजनाचा फुटलेला तोफगोळा तटबंदीत सापडला होता. गडाच्या पूर्व आणि पश्‍चिम भागात असे तोफगोळे सापडत असल्याने त्याविषयी संशोधन होणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com