Kolhapur : मुश्रीफ-शहापूरकरच ‘किंग’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार हसन मुश्रीफ

Kolhapur : मुश्रीफ-शहापूरकरच ‘किंग’

गडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या (गोडसाखर) निवडणुकीत आज आमदार हसन मुश्रीफ, डॉ. प्रकाश शहापूरकर, संध्यादेवी कुपेकर, प्रकाश चव्हाण, अप्पी पाटील, राजेंद्र गड्ड्यान्नावर व संग्राम कुपेकर यांच्या शाहू समविचारी आघाडीने बाजी मारली. आघाडीने तीन ते साडेतीन हजार मताधिक्यांनी सर्व १९ जागांवर बाजी मारत आमदार राजेश पाटील, श्रीपतराव शिंदे, संग्रामसिंह नलवडे व शिवाजी खोत यांच्या काळभैरव विकास आघाडीचा धुव्वा उडविला. मुश्रीफ-शहापूरकरांनी केलेल्या एकहाती सत्तेच्या आवाहनानुसार सभासदांनी एकतर्फी कौल दिला.

‘गोडसाखर’च्या १९ जागांसाठी शाहू समविचारी व काळभैरव आघाडीत दुरंगी लढत होती. पाच अपक्षही रिंगणात होते. सकाळी संस्था गटाचा पहिला निकाल हाती आला. अप्पी पाटील यांचे चिरंजीव सोमनाथ पाटील यांनी २३७ पैकी १९९ मते घेऊन समविचारी आघाडीच्या विजयाचे खाते उघडले. उत्पादक आणि राखीव गटातील उमेदवारांनी घोडदौड कायम ठेवली. पहिल्या फेरीत म्हणजेच कडगाव-कौलगे व गडहिंग्लज-हनिमनाळ गटात शाहू आघाडीला हजार ते दीड हजारांचे मताधिक्य राहिले. कडगाव-कौलगे गटातील काही गावात शाहू आघाडीला एकतर्फीच मतदान झाले. उलट काळभैरवचा नूल-नरेवाडी या हक्काच्या उत्पादक गटातही करिष्मा चालला नाही. त्यामुळे दुसऱ्‍या फेरीतील म्हणजेच भडगाव-मुगळी व नूल-नरेवाडी गटातही शाहू आघाडीचे मताधिक्य कायम राहिले. अखेरच्या महागाव-हरळी गटातील सभासदांनीही शाहू आघाडीच्या बाजूने एकतर्फी कौल दिला.

बहुतांश मतदान केंद्रामध्ये काळभैरव आघाडी मागे राहिली. यामुळे पहिल्या फेरीपासून शाहू आघाडीच्या मताधिक्याचा आलेख वाढत गेला. काळभैरव आघाडीचे स्टार प्रचारक ठरलेले अमर चव्हाण यांच्या विजयाची खात्री बाळगणाऱ्‍यांना चव्हाणांच्या अनपेक्षित पराभवाने धक्का बसला. संस्थापकांचे सुपुत्र संग्रामसिंह नलवडे यांचाही धक्कादायक पराभव झाला. निवृत्त कामगारांच्या थकीत देणीसाठी दीड वर्षे आंदोलन करणाऱ्‍या शिवाजी खोत यांनाही दोन्ही गटांत पराभवाला सामोरे जावे लागले.

शाहू आघाडीचे मताधिक्य बाहेर येऊ लागले, त्यानुसार कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचत होता. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. मतमोजणी परिसरातील सारे रस्ते गुलालमय झाले. रात्री उशिरापर्यंत गावात विजयी मिरवणुका सुरू होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमित गराडे, युसूफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी झाली. पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके, सहाय्यक निरीक्षक रोहित दिवसे, उपनिरीक्षक विक्रम वडणे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त होता.

क्रॉस व्होटिंगची आशा फोल

उमेदवारांच्या समर्थकांनी क्रॉस व्होटिंगची आशा धरली होती. परंतु, गत गळीत हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर अंतर्गत राजकारणातून संचालक मंडळात पडलेली दुफळी कारखान्याच्या जीवावर उठल्याचे उदाहरण डोळ्यासमोर होते. यामुळे निवडणुकीत क्रॉस व्होटिंगची साऱ्‍यांची आशा फोल ठरवत सभासदांनी मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला एक हाती सत्ता दिली.

कोऱ्‍या मतपत्रिका अन् अंगठा

उत्पादक पाच आणि राखीव चार अशा नऊ गटांच्या मतपत्रिका होत्या. त्यामुळे मतदारांचा गोंधळ उडाल्याचे लक्षात येत होते. अठरा मते देण्याचे आवाहन उमेदवार-समर्थकांनी केल्याने अनेक मतदारांनी उत्पादक गटातच सर्व मते टाकली. त्यामुळे राखीव गटातील अनेक मतपत्रिका कोऱ्याच आढळून आल्या. काही मतदारांनी चिन्हावर शिक्का मारण्याऐवजी अंगठा उठविल्याचे दिसून आले.

विजयी उमेदवार (कंसात मते)

उत्पादक गट- बाळासाहेब देसाई (९,७६६), डॉ. प्रकाश शहापूरकर (१०,४००), विश्‍वनाथ स्वामी (९,३१८), अक्षयकुमार पाटील (९,४४०), शिवराज पाटील (९,५१९), अशोक मेंडूले (९,४००), प्रकाश चव्हाण (९,२६७), सतीश पाटील (९,०४३), रवींद्र पाटील (९,७११), सदानंद हत्तरकी (९,८४८), विद्याधर गुरबे (१०,३०१), भरमू जाधव (९,६११), प्रकाश पताडे (९,९२४). अनुसूचित जाती- काशीनाथ कांबळे (१०,४८४). महिला- मंगल आरबोळे (१०,०७४), कविता पाटील (९,६९८). इतर मागास- दिग्विजय कुराडे (१०,०५३). भटक्या विमुक्त- अरुण गवळी (१०,३०९). संस्था प्रतिनिधी- सोमनाथ पाटील (१९९).

पराभूत उमेदवार व पडलेली मते

उत्पादक गट- अशोक देसाई (६१२७), सुजित देसाई (६०९६), विकास पाटील (५७९५), शिवाजी खोत (६३४०), राजेंद्र तारळे (३२९), संग्रामसिंह नलवडे (६४८५), विजय मोरे (६०९६), अमर चव्हाण (७३४४), बाबासाहेब पाटील (६१५४), प्रीतम कापसे (२५६), वसंतराव चौगुले (६१८०), रणजित यादव (५९७७), बाळकृष्ण परीट (६०३८), सुरेश जोतिबा कुराडे (१८३), प्रदीप पाटील (६०३९), संदीप शिंदे (५७७१). अनुसूचित जाती- परशराम कांबळे (६४३४). महिला- शुभांगी देसाई (६३५७), ऊर्मिला पाटील (८२), गीता पाटील (६०००). इतर मागास- प्रवीण पोवार (१११), संजय बटकडली (६६०५). भटक्या विमुक्त- संभाजी नाईक (६६०४). संस्था प्रतिनिधी- शिवाजी खोत (३७).

शाहू आघाडीवर दाखवलेल्या विश्‍वासाबद्दल सभासदांचा मी ऋणी आहे. या विजयाने आघाडीप्रमुख प्रकाश शहापूरकर व प्रकाश चव्हाण यांची जबाबदारी वाढली आहे. कारखाना सुरू करण्याबाबत संचालक मंडळाच्या निर्णयामागे मी ठामपणे उभा राहीन. जिल्हा बँकेच्या माध्यमातूनही सकारात्मक सहकार्य करू. सभासदांचा विश्‍वास सार्थ ठरवण्यासह गोडसाखर ऊर्जितावस्थेत आणून सभासद, कामगारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास नवीन संचालक मंडळाचे प्राधान्य राहील.

- हसन मुश्रीफ, आमदार व शाहू आघाडी प्रमुख

सभासदांचा कौल मान्य असून काळभैरव आघाडीवर विश्‍वास दाखवलेल्या सभासदांचा ऋणी आहे. गडहिंग्लजच्या सहकारातील हे शेवटचे मंदिर शेतकऱ्‍यांच्या मालकीचे रहावे म्हणून आम्ही निवडणूक लढवली. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होती. पैशासमोर शहाणपणा चालत नाही, हे पुन्हा सिद्ध झाले. आमचे नेते हसन मुश्रीफ व विजयी उमेदवारांचे अभिनंदन. गोडसाखर सहकारात चालवून तो सभासदांच्या मालकीचा रहावा, ही शेतकऱ्‍यांची आकांक्षा दिलेल्या शब्दाप्रमाणे नेते मुश्रीफ पूर्ण करतील, अशी अपेक्षा आहे.

- राजेश पाटील, आमदार व काळभैरव आघाडी प्रमुख