कोल्‍हापूर : वाईट संगतच ठरते नशाबाजीचे पहिले कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

drink

कोल्‍हापूर : वाईट संगतच ठरते नशाबाजीचे पहिले कारण

sakal_logo
By
लुमाकांत नलवडे : सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर : मी श्रीमंत आहे. कुटुंब उच्चशिक्षित आहे. मला काळजी करायची गरज नाही, असे म्हणणाऱ्या उच्चभ्रूंनीही घरात घुसलेल्या नशेच्या किडीसमोर हात टेकले आहेत. सुदैवाने काहीजण बाहेर पडले. त्याचवेळीच समुपदेशन झाले; मात्र याच नशेच्या विळख्यात अनेकांची आयुष्य उद्‍ध्‍वस्त झाली आहेत. केवळ संगत नशेचे पहिले कारण ठरू शकते हे कुटुंबीयांना उशिरा कळते.

उदाहरण एक - तो डॉक्टरांचा नातू होता. मित्रांच्या संगतीने त्याला नशेची सवय लागली. अमली पदार्थ मिळाला नाही तर घरी मोडतोड करीत होता. मित्रांची संगत बंद केली. त्यातून तो चिडचिड करू लागला. पुढे ही घटना पोलिसांपर्यंत पोचली. पोलिस निरीक्षकांनी त्याला रोज सकाळ, दुपार, संध्याकाळी पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याची ताकीद दिली. पोलिसांच्या भीतीने तो रोज पोलिस ठाण्यात जाऊ लागला आणि त्याची ही संगत, व्यसन सुटले.

उदाहरण दोन - कोल्हापुरातील बड्या व्यावसायिकाचा मुलगा होता. त्याला पुण्याला ठेवले होते. नशेसाठी तो ट्रकमधून कोल्हापुरात येत होता. कुटुंबीयांकडे श्रीमंती होती. मात्र एका मुलासाठी कुटुंब अस्वस्थ होते. त्याला सुधारण्यासाठी प्रयत्न झाले. पोलिसांनी त्याला अमली पदार्थातून किती वाईट परिणाम होतो, याची माहिती प्रबोधनातून दिली. पुढे वर्षभरानंतर तो व्यसनातून बाहेर पडला.

हेही वाचा: वानखेडेंच्या नावावर बार? क्रांती रेडकर मलिकांना म्हणाल्या, 'जबाबदार पदावर असूनही तुम्ही...'

दोन्ही उदाहरणे कोल्हापुरातील आहेत. पोलिसांकडून याची माहिती मिळाली आहे. तेव्हा नशा करण्याची पद्धत वेगळी होती. आता फॅशन मानले जाते. शहरात नशेसाठी गांजा उपलब्ध करून देणाऱ्या पैकी दोघे कारागृहात आहेत. तर काहींवर खटले सुरू आहेत. काहींचे आधारस्‍तंभ (?) मयत झाले असले तरीही त्यांचे काही पंटर आजही या व्यवसायात आहेत. गांजाची कमी ग्रॅममध्ये विक्री केली तर त्याला जामीन मिळत असल्याचा अनुभव पोलिसांचा आहे. सध्या विक्रेते मोबाईलवरील संपर्कावरून ग्राहक करीत असल्याची माहिती देण्यात आली. मध्यवस्तीपासून ते झोपडपट्टीपर्यंत रॅकेट असल्याचे सांगितले जाते. मात्र तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे येत नाही.

‘ओव्हर डोस’

सोशल मीडियावर ‘ओव्हर डोस’ म्हणून एक ग्रुप असून त्यावर अमली पदार्थांची मागणी आणि विक्री होत असल्याचे सांगण्यात येते. या ग्रुपवर संदर्भचा ‘एसएमएस’ असेल तरच त्यांची नोंद घेतली जाते असेही सांगण्यात आले. या ग्रुपवरून अमली पदार्थांची देवाण-घेवाण होत असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

(सकाळ Impact) पानपट्टीतून बर्न पेपर विक्री करू नये : अरुण सावंत

‘सकाळ’ने मालिका सुरू केल्यानंतर जिल्हा पानपट्टी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण सावंत यांनी ‘सकाळ’शी संपर्क साधून पानपट्टी असोसिएशनने गांजासह अमली पदार्थ विक्रीसाठी कोणालाही प्रोत्साहित करू नये. रिजला पेपर (बर्न पेपर), पेपर कोन, अवैध गुटखा विक्री करू नये. कोणी करीत असल्यास ते बंद करावे, असे आवाहन त्यांच्या सभासदांना केले आहे. त्‍यांनी सोशल मीडियावर जिल्‍ह्यातील सर्व व्‍यवसायिकांना तसे संदेश दिले आहेत, अशी माहिती दिली. ते म्‍हणाले, ‘सकाळ’ने झिंगणाऱ्या तरुणाईवर चांगली लेखमाला सुरू केली आहे. त्याबद्दल ‘सकाळ’चे अभिनंदन!. यानिमित्ताने मी सांगू इच्छितो, आमच्या संघटनेने आजवर वाईट, अनिष्ट आणि अनैतिक प्रवृत्तीला विरोध केला आहे. तो आजही करत आहे. गांजा किंवा तत्सम अमली पदार्थ विकण्याचे धाडस दुकानदारांत नाही. तरीही शहर व सर्व पानपट्टी दुकानदारांना विनंती करतो, की जे कोणी दुकानदार हे रिजला पेपर, पेपर कोन, अवैध गुटखा विकत असतील तर त्यांनी ते बंद करावेत. प्रामाणिकपणे व्यवसाय करून पानपट्टी व्यवसायाला प्रतिष्ठा प्राप्त करून द्यावी.

loading image
go to top