कोल्हापूर : नालेसफाई केली, मग तक्रारी का? सतेज पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सतेज पाटील

कोल्हापूर : नालेसफाई केली, मग तक्रारी का? सतेज पाटील

कोल्हापूर : नालेसफाई करूनही नागरिकांच्या तक्रारी का येतात? असा सवाल करीत उर्वरित नालेसफाई लवकर पूर्ण करा, पाऊस सुरू होण्‍यापूर्वी आरोग्य विभाग सक्षम करण्यासाठी लागणारी मशिनरी तातडीने खरेदी करण्याचे आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज महापालिका प्रशासनाला दिले.

ताराबाई पार्क येथील निवडणूक कार्यालयात मंत्री पाटील यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेतला. या वेळी आमदार जयंत आसगावकर, ऋतुराज पाटील, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे व अधिकारी उपस्थित होते.

श्री. पाटील यांनी मुख्य आरोग्य निरीक्षकांकडून नालेसफाईची माहिती घेतली. त्यानंतर ते म्हणाले, ‘‘आरोग्य विभागाकडे साधनसामग्री कमी असल्यास जीएम पोर्टलवरून तातडीने आवश्यक साधने खरेदी करा, कचरा उठावासाठी छोटे डंपर, टिपर, ट्रॅक्टर, जेसीबी, स्विपिंग मशिन व इतर आवश्यक साधने खरेदी करावी. सहा प्रभागांसाठी एक ट्रॅक्टर याप्रमाणे १६ ट्रॅक्टर कचरा, पालापाचोळा गोळा करण्यासाठी खरेदी करावेत. मुख्य चौकात, गर्दीच्या ठिकाणचे कंटेनर खराब झाले असल्यास दुसरे कंटेनर अथवा ट्रॅक्टर-ट्रॉली लावावी. यातून दोन शिफ्टमध्ये कचरा उठाव करावा. प्रायोगिक तत्त्वावर मध्यवर्ती बसस्थानक व पर्ल हॉटेल येथे ट्रॅक्टर ट्रॉली लावावी. अंबाबाई मंदिर परिसरातील सर्व रस्ते स्वच्छ असावेत. तिथे कचरा उठाव व स्वच्छतेसाठी दोन शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांचे फिरते

पथक नेमा.’’

ते म्हणाले, ‘‘घाटी दरवाजाजवळ फूल विक्रेत्यांसाठी ट्रॉली लावावी. प्रत्येक प्रभागात किती कर्मचारी काम करतात, याचे ॲप तयार करावे. स्मशानभूमीकडे दान स्वरूपात जमा होणारी लाकडे बुद्ध गार्डन अथवा बंदिस्त ठिकाणी जमा करून घ्यावीत. नंतर स्मशानभूमीतील शेडमध्ये कटिंग केलेली लाकडे ठेवा.’’

उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी १६ ट्रॅक्टर खरेदीचे नियोजन केले आहे. तसेच, हॉटेलमधील कचरा जमा करण्यासाठी चार कार्गो डंपर, चार डंपर, चार जेसीबी व एक स्विपींग मशिन १० दिवसांत जीएम पोर्टलवरून खरेदी करणार असल्याचे सांगितले.

अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, कार्यकारी अभियंता हर्षजित घाटगे, उपशहर अभियंता नारायण भोसले, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील, वर्कशॉप प्रमुख चेतन शिंदे उपस्थित होते.

पालकमंत्र्यांच्या सूचना

सहा प्रभागांसाठी एकप्रमाणे १६ ट्रॅक्टर घ्या

कंटेनर खराब असल्यास दुसरा कंटेनर अथवा ट्रॅक्टर ट्रॉली लावा

प्रायोगिक तत्त्वावर मध्यवर्ती बसस्थानक व पर्ल हॉटेल येथे ट्रॉली लावा

अंबाबाई मंदिर परिसरात रस्ते स्वच्छतेला फिरते पथक नेमा

Web Title: Kolhapur Cleaning Complaints Satej Patil

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top