
kolhapur : शासकीय रुग्णालयात नोकरी करणाऱ्या डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिस
कोल्हापूर : शासकीय रुग्णालयात नोकरी करणाऱ्या डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिस करण्यास मान्यता नाही. असे असतानाही सीपीआर रुग्णालयातील १६ डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करीत आहेत. एकाच वेळी शासकीय वेतन व खासगी सेवेतून पैसे कमवत आहेत. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील रुग्ण सेवेकडे दुर्लक्ष होत आहे, अशा आशयाच्या तक्रारीचे निवेदन राज्याच्या वैद्यकीय शिक्षण सचिव व वैद्यकीय शिक्षण मंत्र्याकडे गोपनीयस्तरावर रुग्णांकडून पाठवले आहे.
सीपीआर रुग्णालयातील डॉक्टर्सवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन व रुग्णांवर उपचाराची जबाबदारी आहे. सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत डॉक्टर्स रुग्ण तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया सेवा देऊन निघून जातात. सायंकाळी खासगी रुग्णालयात प्रॅक्टिस करतात. सीपीआरमध्ये दुपारनंतर प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स मर्यादित उपचार सेवा देतात. त्यामुळे रुग्णांना दुसऱ्या दिवशी डॉक्टर येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागते, त्यामुळे रुग्णांचे हाल होतात. या पार्श्वभूमीवर मंत्र्याकडे तक्रार झाली आहे.
शासनाकडून व्यवसाय रोध भत्ता न घेणाऱ्या शासकीय डॉक्टर्सना पूर्वी खासगी प्रॅक्टिस करण्याची मुभा होती. मात्र, गेल्या दोन वर्षांत नियमात बदल झाले, शासकीय डॉक्टर्सनी व्यवसायरोध भत्ता घ्यावा, पण खासगी प्रॅक्टिस करू नये, असे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाने दिले. तेव्हा सीपीआरमधील डॉक्टर्सनी खासगी प्रॅक्टिस करणार नाही, असे प्रशासनाला लेखी दिले होते. त्यातील काही डॉक्टर्सच खासगी प्रॅक्टिस करत आहेत. अशा डॉक्टर्सची नावे व खासगी रुग्णालयांची नावे त्या तक्रार निवेदनात स्पष्टपणे नमूद आहेत.
असे डॉक्टर, अशी व्याप्ती
सीपीआरमधील चार प्राध्यापक, तीन विभाग प्रमुख, उर्वरित सर्वसहयोगी प्राध्यापकांची नावे तक्रारीत आहेत. शाहूपुरी, राजारामपुरी, फुलेवाडी, शिवाजी पेठ, इचलकरंजी, लक्ष्मीपुरी, कळंबा रोड, साने गुरुजी वसाहत येथील खासगी रुग्णालयात सेवा देत असल्याचाही त्यात उल्लेख आहे.