कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या सजावटीला कागदी थाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Ecofriendly

कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या सजावटीला कागदी थाट

कोल्हापूर : श्रीगणेशाला कलेची देवता म्हणून ओळखले जाते. याच गणेशाच्या स्वागतासाठी कलाकारांच्या कल्पनांनाही पंख फुटले आहेत. गणेशोत्सवाला इकोफ्रेंडली जोड देण्याची चळवळ रूजू लागल्याने काही युवा कलाकारही कलेच्या माध्यमातून निसर्गाशी नाळ जोडत आहेत. एकीकडे फोम, प्लास्टिक, फायबर अशा सजावटीच्या विळख्यात गणेशमूर्ती बसवणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, या गर्दीतही काही तरुणांचे हात फक्त विविध रंगाचे आणि पोताचे कागद वापरून पर्यावरणपूरक सजावट करून या विधायक चळवळीत खारीचा वाटा उचलत आहेत.

इकोफ्रेंडली सजावटीची इच्छा आहे; पण नेमकी वाट सापडत नसलेल्या हौशी कलाकारांनाही घरच्याघरी सहजपणे या कलाकृती करता येतील अशी प्रेरणा देणाऱ्या या कल्पना आहेत. कागदापासून विविध सजावटीच्या वस्तू तयार करणाऱ्या शिवांजली देसाई यांनी घरच्या गणपती सजावटीसाठी कागदासोबत नव्याने मैत्री केली. वेगळ्या रंगाचा आणि पोताचा कागद, डिंक, दोरा आणि पुठ्ठा अशा कागदी साहित्याची जुळवाजुळव करून दरवर्षी घरच्या मूर्तीसाठी सजावट करतात. त्यांना ओरिगामीची आवड आहे.

ओरिगामी प्रकारात कागदाला फक्त घड्या घालून झुंबर, कमान, चक्र असे प्रकार लीलया करता येतात. बाजारात देखील कागदापासून बनविलेल्या शिटसह, तयार कमान, जाळी, खांब, फुले, अष्टविनायक अशा वस्तू मिळतात. त्या विकत आणायच्या आणि फक्त मूर्तीभोवती कल्पकतेने मांडायच्या यामध्येही निसर्गाशी जोडले जात असल्याची भावना या कलाकारांची आहे.

या कागदांचा होतोय वापर

क्रेप कागद, चुरमुरे पेपर, हँडमेड पेपर, कार्डशिट, खराब वह्यांचे पुठ्ठे यांचा कलात्मक वापर करून बाप्पांच्या सजावटीचा केलेला हा कागदी थाट पर्यावरणसंवर्धनाचा नवा मंत्र देणारा आहे.

गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये एका ऑनलाईन कार्यशाळेत मी सहभाग घेतला. यामध्ये ओरिगामी प्रकारातील कागदापासून गणपती आणि मोदक तयार करण्यास शिकवले. मीही लगेचच ते तयार केले. त्यापासूनच घरातल्या गणपतीची आरास केली. यंदाही कागदापासून सजावट करणार आहे.

- शिवांजली देसाई

Web Title: Kolhapur Ecofriendly Ganeshotsav Decorations Made Of Paper

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..