कोल्हापूर : ‘उत्तर’मधील तटस्थांना दारे बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर उत्तर मतदार संघाच्या पोटनिवडणूकीची

कोल्हापूर : ‘उत्तर’मधील तटस्थांना दारे बंद

कोल्हापूर : प्रतिष्ठेच्या बनलेल्या उत्तर पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी व भाजपने ‘आर या पार’ची लढाई केली. त्यासाठी अक्षरशः जंग जंग पछाडले. शेवटच्या कार्यकर्त्याला चार्ज करून मतदान मिळवण्यासाठी आटापिटा केला. त्यावेळी एका-एका माणसाची गरज असताना आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेकांनी ‘तटस्थ’ राहण्याचा मध्यम मार्ग स्वीकारला होता. आता महापालिका निवडणुकीत त्यांना पक्षाची छत्रछाया असावी, असे वाटत होते; पण पक्षाने त्यांच्यासाठी दारे बंद केली आहेत. ज्यांच्या भरवशावर निवडणूक लढवण्याचे नियोजन केले होते, त्यांनीच आता वाऱ्यावर सोडल्याची अनेकांची स्थिती आहे.

महापालिका निवडणुकीचे पडघम वाजत असतानाच उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली होती. महाविकास आघाडी तसेच भाजपसाठी ही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी लिटमस टेस्ट होती. त्यासाठी दोन्हीकडून राज्यस्तरावरील नेत्यांची फौज प्रचाराला उतरली होती. दोन्हीकडील स्थानिक नेत्यांनी महापालिकेच्या निवडणुकीप्रमाणे भागनिहाय कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. पोटनिवडणूक कार्यकर्त्यांना बांधून ठेवण्यासाठी नेत्यांसाठी, तर कार्यकर्त्यांनाही आपापल्या भागातून चांगले मतदान करून नेत्यांचा विश्‍वास संपादन करण्याची संधी होती.

त्यामुळे नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून अपेक्षा वाढल्या होत्या. भागातील मताधिक्य विरोधकांकडे जाऊ नये, यासाठी आपल्या गोटात माणसे यावीत, असे प्रयत्न होते. त्यावेळी महापालिकेतील माजी नगरसेवक काही इच्छुकांनी तटस्थ राहण्याचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या या भूमिकेमुळे नेत्यांना त्या भागात वेगळ्या जोडण्या कराव्या लागल्या. हक्काचा माणूस सोडून नवीन माणूस जोडावा लागला. तटस्थांकडूनही या निवडणुकीत पत्ते खोलले आणि निकाल वेगळा लागला, तर ‘ना घर का... ना घाट का’ असे होण्यापेक्षा थांबण्याची भूमिका घेतली होती; पण ही भूमिका नेत्यांच्या लक्षात राहिली होती. आता आरक्षण सोडत झाल्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीत त्रिसदस्यीय प्रभागरचनेत या तटस्थांना पक्षाची गरज लागणार आहे. त्यामुळे त्यांनी आता नेत्यांशी संपर्क वाढवण्यास सुरुवात केल्यानंतर नेत्यांनी ‘तुमच्यासाठी आमची दारे बंद’ अशी भूमिका घेतली आहे.

भागांत आपली उमेदवारी या पक्षाकडून असेल हे दाखवण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील असल्याने अशा तटस्थांना विरोधकाला पुढची चाल मिळू नये म्हणून भूमिका घेणेच गरजेचे आहे.

सारीपाट मांडण्यास सुरुवात

काही तटस्थ माजी नगरसेवक, काही भावी इच्छुक आहेत. पक्षीय उमेदवारीला महत्त्व असल्याने त्यांची इच्छा असलेल्या पक्षाकडून रेड सिग्नल मिळाल्याने ते तगड्या विरोधकांच्या गोटात शिरण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांचीही मनधरणी करावी लागत असली तरी जागा व आरक्षण पाहता पक्षांनाही फ्रेश उमेदवारांपेक्षा ताकदीचा उमेदवार महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे निवडणुकीचा सारीपाट मांडण्यास सुरुवात झाली आहे.

Web Title: Kolhapur Elections Doors Closed Neutrals North

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top