कोल्हापूर : फुटबॉल स्पर्धेला पुन्हा गालबोट

पीटीएम-शिवाजी तरुण मंडळाचे खेळाडू भिडले
खिलाडू  परंपरेला गालबोट लागले.
खिलाडू परंपरेला गालबोट लागले.sakal

कोल्हापूर : राजर्षी शाहू चषक फुटबॉल स्पर्धेत शिवाजी आणि पाटाकडील  या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांतील सामन्यात झालेल्या खेळाडूंच्या हाणामारीमुळे सामन्यालाच नाही तर खिलाडू  परंपरेला गालबोट लागले.सुरुवातीपासूनच जिंकण्याच्या उद्देशाने आणि पाठीराख्यांच्या भक्कम आधाराने मैदानावर उतरलेल्या दोन्ही  संघांमधील सामना रोमहर्षक होणार अशी खात्री असल्याने हजारो शौकिनांनी हजेरी लावली होती.

मध्यानंतर दोन गोलीचे ओझे घेऊन मैदानावर उतरलेल्या पाटाकडील संघ तणावाखालीच होता, तर शिवाजी आघाडी कमी होऊ द्यायची नाही, याच ईर्ष्येने खेळत होता. पाटाकडीलच्या ‘डी’ जवळ चेंडूवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात पाटाकडीलच्या प्रथमेश हेरेकर याने शिवाजीच्या ऋतुराज सूर्यवंशी याला लाईनवर अवैधरीत्या रोखले; पण मैदानावर पडून उठल्यानंतर दोघेही थेट मैदानावरच एकमेकाला भिडले. हा वाद सोडवण्यासाठी काही खेळाडू धावले आणि यातून झालेल्या गर्दीत खेळाडूंची हाणामारी सुरू झाली. प्रशिक्षक, पंच, पोलिस आणि आयोजक भांडण सोडवण्यासाठी मैदानावर धावले. तोपर्यंत शिवाजी मंडळाचा सहायक प्रशिक्षक शिवतेज खराडे यानेही मैदानावर येऊन पाटाकडीलच्या खेळाडूवर हात उगारला आणि पुन्हा दोन्हीकडील खेळाडू एकमेकाला भिडले. आतापर्यंत प्रेक्षकांमध्ये बाटल्या, दगडफेक होत होती; परंतु खेळाडूच थेट एकमेकाला भिडल्यामुळे आणि त्यांनी हाणामारी सुरू केल्यामुळे क्रीडाशौकीन अवाक्‌ झाले.

पोलिस उपअधीक्षक रवींद्र साळोखे, पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे आणि ईश्वर ओमासे यांच्यासह सुमारे पन्नासहून अधिक पोलिसांनी मैदानावर धाव घेतली. वाद घालणारे एकमेकांच्या अंगावर धावून जाणारे खेळाडू त्यांचे अतिउत्साही पाठीराखे यामुळे मैदानाची रणभूमी झाली. याचवेळी पंचांशीही खेळाडूंनी वाद घातला. कोणाचा कोणाशी वाद होतोय, हेच समजेना. आयोजकांनी वारंवार स्पीकरवरून लोकांना मैदानाबाहेर येण्याची आणि खेळाडूंना वाद थांबवण्याची सूचना केली; अन्यथा सामना बंद करण्याचा दमही दिला. दरम्यान, अनेक माजी खेळाडू आणि केएसए पदाधिकाऱ्यांनी कशीबशी समजूत काढत दोन्ही संघांना शांत केले.

त्याचवेळी पाटाकडील संघाचे प्रशिक्षक शरद माळी आक्रमकपणे मैदानावर धावून आले. त्यामुळे वातावरण पुन्हा बिघडले. पाटाकडीलने तर मैदानाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान पोलिस निरीक्षक ओमासे यांनी मैदानावर आलेल्या शरद माळी यांच्यासह पाठीराख्यांना कारवाई करण्याचा दम दिला. याच वेळी गॅलरीत आलेल्या युवराज मालोजीराजे छत्रपती यांनी थेट मैदानावर धाव घेत परिस्थिती हाताळत दोन्ही संघांचे प्रशिक्षक आणि खेळाडूंची समजूत घातली आणि चूक असेल त्या खेळाडूवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगून पोलिसांना आणि नागरिकांना मैदानाबाहेर घालवले.

मैदानात जाऊन दोनही संघांच्या खेळाडूंना एकत्र केले. त्यांच्याशी चर्चा केली आणि खेळ सुरू करण्याची सूचना देऊन ते प्रेक्षक गॅलरीत बसले. यानंतरची ३० मिनिटे सामना वादाशिवाय झाला; पण सामना पार पडला तरी मैदानावरची भांडण खिलाडू वृत्तीला डाग लावून गेला.

चाकू बाळगणाऱ्या क्रीडाशौकिनावर गुन्हा

कोल्हापूर: छत्रपती शाहू स्टेडियममध्ये चाकू नेण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तरुणावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला. सलमान रियाज बागवान (शुक्रवार पेठ) असे संशयिताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले, पाटाकडील तालीम व शिवाजी तरुण मंडळ संघात अंतिम सामना होता. सामना पाहायला जाणाऱ्या प्रेक्षकांना प्रत्येक गेटवर तपासून आत सोडण्यात येत होते. गेटनंबर दोनच्या पायरीवर दुपारी साडेतीनच्या सुमारास संशयित सलमान याच्याकडे चाकू मिळून आला, तो पोलिसांनी जप्त केला. या संबंधीचा तपास अंमलदार रमेश डोईफोडे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com