
कोल्हापूर : आरोग्य केंद्रांचे आरोग्य धोक्यात
कोल्हापूर : शहरासह ग्रामीण भागातही विविध सुविधा मिळू लागल्या आहेत. ग्रामीण भागाचा सर्वार्थाने विकास होत असतानाच ग्रामीण आरोग्य केंद्र मात्र दुर्लक्षित राहिले आहे. आरोग्य केंद्र उभारल्यानंतर त्याची योग्य स्वच्छता राखली जात नाही. आरोग्य केंद्राभोवती मोठे गवत उगवणे, छत गळणे, केंद्राबाहेर पावसाचे पाणी साचून डासांची उत्पत्ती होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रांचे आरोग्य कधी सुधारणार, हा कळीचा मुद्दा ठरत आहे.
जिल्ह्यातील गावागावांत असणाऱ्या आरोग्य केंद्रांभोवती अस्वच्छता आहे. तिथे जाणाऱ्यांना रुग्णांना बसण्याची व्यवस्था नाही. याशिवाय, दवाखान्याभोवती काटेरी झुडपे उगवलेली आहेत. डासांचा प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी औषध फवारणी महत्त्वाची आहे. यासाठी ज्या-त्या ग्रामपंचायतींकडूनही त्याची स्वच्छता होणे अपेक्षित आहे. आरोग्य केंद्रांभोवती पावसाळ्यात वाढणाऱ्या वनस्पती वाढल्या आहेत. करवीर, राधानगरी, गगनबावडा तालुक्यातील बहुतांशी आरोग्य केंद्रांमध्ये गळती सुरू आहे. त्यामुळे तपासणी केंद्रात पाणी असल्याने रुग्णांना उपचार देणे कठीण झाले आहे. पावसाळ्यापूर्वीच या वास्तूंची डागडुजी केली पाहिजे होती. आरोग्य केंद्राभोवतीची स्वच्छता करणे अपेक्षित होते, याकडे दुर्लक्ष झाले आहे. ही परिस्थिती प्रत्येक वर्षी पहायला मिळते.
तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे
आरोग्य विभागाकडून पावसाळ्यात पाणी साचू नये, याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले जाते. डास अंडी घालतील, अशा अडगळीच्या ठिकाणी पाणी साचत असेल तर ते दूर करावे, अशाही सूचना केल्या जातात. प्रत्यक्षात मात्र दिव्याखाली अंधार, अशी परिस्थिती आहे. आरोग्य केंद्र, उपकेंद्रासमोरच पाण्याची डबकी साचलेली दिसत आहेत. यावर तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.
शासकीय आरोग्य केंद्रात कुबट वास येत असतो. बाहेरील परिसरही स्वच्छ नसल्याचे अनेकदा पाहायला मिळते. यावर तत्काळ उपाय केले पाहिजेत. तरच रुग्णांनाही उपचार घेणे सोपे आणि फायद्याचे होईल.
- संदीप जगताप, आरोग्य केंद्राचा लाभार्थी
Web Title: Kolhapur Health Health Centers Danger
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..