कोल्हापूर : भारतीय कबड्डी रुजतेय अन्य देशांत

ई. प्रसाद राव; काही वर्षांत ऑलिम्पिकमध्ये नक्कीच होईल समावेश
कबड्डी
कबड्डीsakal

कोल्हापूर : भारतीय कबड्डी संघाचे प्रशिक्षक ई. प्रसाद म्हणाले, ‘हुतुतू अथवा कबड्डी हा खेळ ग्रामीण भागात खेळला जात होता. त्याचे नियम वेगळे होते. हा खेळ एका नियमांच्या चौकटीत बसवला गेला. गरिबांचा खेळ म्हणून ओळखल्या गेलेल्या कबड्डीचा श्रीलंका, पाकिस्तान बांगला देश, मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया, कोरिया, जपानमध्ये प्रसार केला आहे. विशेष म्हणजे युरोपातही तो खेळला जात आहे. वेस्ट इंडिजमध्ये मंदिरातच राहून त्याचे प्रशिक्षण खेळाडूंना दिले. कतारमध्येही कबड्डी इव्हेंट घेतला. त्याचे पोस्टर्स शहरातील रेस्टॉरंटमध्ये लावले. कतारच्या राजाने कबड्डीचा वाढता प्रसार पाहून कबड्डी स्पर्धेसाठी मुख्य मैदान दिले.’

ते म्हणाले, ‘भारतात २००६ ला प्रो-कबड्डी लीग सुरू झाली. त्यावेळी लिलावात राकेश कुमारवर वीस हजारांची बोली लागली. कोल्हापूर जिल्ह्यातील सिद्धार्थ देसाई याला अलीकडच्या काळात १ कोटी २५ लाखांची बोली लागली. याचा अर्थ कबड्डीचा विकास वेगाने होत आहे. भारत सरकार या खेळाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करत आहे. ‘क्लब कल्चर’ विकसित करण्यासह प्रत्येक राज्यात कबड्डी लीग घेतली जाणार आहे.

ग्रामीण खेळ म्हणून उदयास आलेला कबड्डी खेळ ‘भारतीय संस्कृती’ म्हणून विविध देशांत रुजत आहे. ‘माती ते मॅट’ असा त्याचा प्रवास झाला असून, आशियाई देशांसह युरोपातही त्याचे लोण पसरत आहे. काही वर्षांत या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये नक्कीच समावेश होईल, असा विश्‍वास भारतीय कबड्डी संघाचे प्रशिक्षक ई. प्रसाद राव यांनी आज येथे व्यक्त केला. सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित ‘सिटिझन एडिटर’ उपक्रमात त्यांनी भारतीय कबड्डीवर नेमकेपणाने भाष्य केले. सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार, निवासी संपादक निखिल पंडितराव, शिवछत्रपती पूरस्‍कार विजेत्या उमा भोसले-भेंडिगिरी, अण्णासाहेब गावडे प्रमुख उपस्थित होते. उद्यमनगरातील ‘सकाळ’च्या मुख्य कार्यालयात उपक्रम झाला.

ग्लॅमर देण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण

क्रिकेट व कबड्डीची तुलना कोणी करू नये. क्रिकेट आर्थिक उद्योग असणारा खेळ आहे. त्याचे व्यवस्थापन, व्यावसायिकता वेगळी आहे. त्याला आकार देण्याचे काम माध्यमांनीच केले. कबड्डीला ग्लॅमर मिळवून देण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे श्री. राव यांनी सांगितले.

वेस्ट इंडिजचे खेळाडू आणि बच्चन भेट

वेस्ट इंडिजमधील नागरिकांना अभिनेता अमिताभ बच्चनबद्दल आकर्षण आहे. तेथील खेळाडूंना कबड्डीचे प्रशिक्षण देताना बच्चन यांची भेट घडवून आणतो, असे सांगून मुंबईला घेऊन आलो होतो. तेथे त्यांना कबड्डीचे प्रशिक्षण देत बच्चन यांचे बाहेरूनच घर दाखवले, अशी मजेशीर आठवण राव यांनी सांगितली. तसेच जगभरात ‘कबड्डी मास्टर’ म्हणून ओळख निर्माण झाल्याचेही स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com