Kolhapur : जोतिबावर मिनी चैत्र यात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur Jyotiba Temple

Kolhapur : जोतिबावर मिनी चैत्र यात्रा

जोतिबा डोंगर : श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी तथा जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथे दीपावलीच्या सुट्यांच्या निमित्ताने आज जोतिबा डोंगराला मिनी चैत्र यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. आज महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील सुमारे दीड लाख पर्यटक व भाविकांनी जोतिबा दर्शन घेतले. पहाटे पाच वाजल्यापासून भाविक डोंगरावर दाखल होण्यास सुरुवात झाली.

सकाळी दहा वाजता डोंगर हाउसफुल्ल झाला. भाविकांनी मंदिर शिखर व पालखीवर गुलाल-खोबऱ्याची उधळण केल्यामुळे जोतिबा डोंगर गुलालात न्हाऊन गेला. पुजाऱ्यांच्या घरी भाविकांनी गर्दी केली. मंदिरात पहाटे काकड आरती मंगलपाठ, केदार स्तोत्र, केदार महिमाचे पठण झाले. सकाळी दहा वाजता जोतिबा देवाची अलंकारिक रूपातील महापूजा बांधण्यात आली.

आज दक्षिण दरवाजापर्यंत दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. डोंगरावर आज बंदोबस्त कमी असल्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांचे हाल झाले. यमाई मंदिर परिसर, शासकीय विश्रामगृह या भागात दिवसभर अनेक वेळ वाहतूक विस्कळीत होऊन मोठी कोंडी झाली. होमगार्डनी वाहतूक नियंत्रित केली.

कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शीतल कुमार डोईजड यांच्या मार्गदर्शनाखाली कडक सुरक्षा व्यवस्था तैनात होती. मंदिरात आज देवस्थान समितीचे अधीक्षक दीपक मेहत्तर, सरपंच राधा बुणे, शिंदे देवस्थानचे अधीक्षक अजित झुगर यांनी भेटी दिल्या.