Kolhapur : कुस्तीपटू श्रावणीचे परिस्थितीशी दोन हात

हवे मदतीचे बळ; आशियाईत स्पर्धेत रौप्यपदक, पण कौतुकाशिवाय काहीच नाही
Kolhapur
Kolhapursakal

कोल्हापूर : आई भाजीपाला विक्रेती, तर वडील मार्केट यार्डात हमाल. घरची परिस्थिती बेताची असल्याने अडचणींचा डोंगर. या परिस्थितीतही कुस्तीपटू श्रावणी महादेव लव्हटेने आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक मिळविले. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळविल्याने तिच्यावर पाठीवर कौतुकाची थाप मिळाली. त्याचवेळी तिच्या खुराकाची चिंता मिटेल, असे वाटत होते; मात्र तिला आर्थिक आधार देण्यासाठी ना कोणी, सरसावले ना तिला प्रायोजक भेटला. श्रावणी पन्हाळा तालुक्यातील कोतोलीची. तिचे वडील महादेव लव्हटे यांना कुस्तीची आवड. त्यांनी तिला गावातील तालमीत कुस्तीच्या सरावासाठी पाठवले. आर्थिक स्थिती भक्कम नसताना त्यांनी मुलीचे कुस्तीत करिअर करण्याचा निर्णय घेतला.

आईने भाजीपाला विकून त्यातील पैसे घरखर्चासह तिच्या खुराकासाठी वापरण्याचे ठरविले. लव्हटे दाम्पत्याची द्वितीय कन्या विशेष असल्याने तिच्या उपचारासाठी त्यांना पैशाची वेळोवेळी गरज पडत होती. आजही तिच्या उपचारासाठी त्यांना काटकसर करावी लागते. श्रावणीने घरची स्थिती लक्षात घेत मैदान गाजविण्यास प्रारंभ केला.

शिंगणापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू विद्यानिकेतन व क्रीडा प्रशालेत प्रवेश घेतल्यानंतर तिला कुस्तीचे तंत्रशुद्ध धडे मिळू लागले. प्रशिक्षक संदीप पाटील यांनी तिचा कसून सराव घेण्यास सुरवात केली. त्यातून ती ज्या मैदानात जाईल, तेथे बक्षिसे मिळवू लागली. जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर ती पदकांची मानकरी ठरू लागली. तिने आंतरराष्ट्रीयस्तरावर पदक मिळविल्यानंतर त्याचा फारसा गाजावाजा झाला नाही. केवळ तिच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळाली. तिच्या मदतीसाठी कोणी धावले नाही. त्यामुळे आजही तिच्या खुराकाची जबाबदारी कोणी उचललेली नाही.

  • श्रावणीची लाखमोलाची कामगिरी....

  • झारखंड येथे झालेल्या १५ वर्षांखालील गटात सुवर्ण

  • बिहारमध्ये १५ वर्षांखालील स्पर्धेत कांस्य

  • झारखंड येथे झालेल्या १७ वर्षांखालील सब ज्युनिअर स्पर्धेत कांस्य, तर १५ वर्षांखालील गटात सुवर्ण

  • लखनऊ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत सुवर्ण

  • बेहराण येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत रौप्य

  • १७ वर्षांखालील फेडरेशन कप स्पर्धेसाठी ४० किलो गटात निवड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com