
Kolhapur : महावीर उद्यानात होणार राज्यातील तिसरे ‘संवेदना उद्यान’
कोल्हापूर : अंधांच्या दररोजच्या जीवनातील येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सरकार, स्वयंसेवी संस्था विविध उपक्रम, योजना राबवतात. पण, या घटकांच्या मनोरंजनाचा विचार फारसा झालेला नव्हता.
आता त्यादृष्टीने विचार करून अंध, कर्णबधिर, बहुविकलांगांच्या मनोरंजन, विरंगुळ्यासाठी राज्यातील तिसरे संवेदना उद्यान कोल्हापुरात साकारले जात आहे. येथील नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाईंडच्या (नॅब) सहकार्यातून महापालिकेने महावीर उद्यानात या आगळ्यावेगळ्या उद्यानाची उभारणीची प्रक्रिया सुरू केली आहे.
शाळा, घरात विविध माध्यमांद्वारे त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याला अत्याधुनिक साधनांची जोड मिळत आहे. पण, खुल्या वातावरणात जाऊन अंदाज घेत इतर मुलांप्रमाणे उद्यानांमध्ये बागडण्याबरोबरच निसर्गाचा आनंद घेत स्पर्श, गंध, ध्वनी या संवेदनांचा विकास करण्यासाठी संवेदना उद्यान ही संकल्पना पुढे आली आहे.
त्या उद्यानाची रचना कशा प्रकारची असावी यासाठी मॉडेल उद्यान नाशिक येथील नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाईंड येथे साकारले आहे. त्यानुसार ठाण्यातही उद्यान उभे केले आहे.
यात मनोरंजनातून बुद्ध्यांक वाढवून व्यक्तिमत्त्व विकासासाठी संवेदना उद्यान उभे करण्यासाठी येथील नॅबने महापालिकेकडे मागणी केली होती. त्यानुसार बैठक होऊन उद्यानाचे सादरीकरण झाले. महावीर उद्यानातील पूर्व बाजूकडील मोकळी जागा निवडली असून, सुरत अंजली असोसिएटसने आराखडा तयार केला आहे.
त्यासाठी पन्नास लाखांची तरतूद केली असून निविदाही मागवल्या आहेत. महावीर उद्यानात स्पर्श, गंध, ध्वनीबाबतचे ज्ञान मनोरंजनातून वाढविण्यासाठी विविध खेळणी, सुगंधी फुलझाडे, रचना, पदपथ करण्यात येणार आहेत. महिनाअखेरपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाला सुरूवात केली जाणार आहे. त्यानंतर सहा महिन्यांच्या अवधीत उद्यान उभे केले जाईल.
नॅबच्या मागणीनुसार नाशिकमध्ये साकारलेल्या उद्यानाच्या धर्तीवर उद्यानाचा आराखडा तयार केला आहे. त्यासाठी निधीची तरतूद केली असून, निविदा प्रक्रिया राबवली जात आहे.
-अनुराधा वांडरे, अभियंता, प्रकल्प विभाग