
Kolhapur : विजेसाठी शाहूवाडीत मोर्चा ; राजू शेट्टींचा पुढाकार
शाहूवाडी : शेतीला दिवसा १२ तास वीज मिळावी, वन्यप्राण्यांपासून शेतीचे संरक्षण व्हावे या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज येथील तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चासमोर येऊन शासकीय अधिकाऱ्यांना प्रश्नांबाबत उत्तरे द्यावी लागली. अधिकाऱ्यांनी मागण्यांची पूर्तता वेळेत न केल्यास जाब विचारण्यासाठी पुन्हा धडक मोर्चा काढू, असा इशारा खासदार शेट्टी यांनी दिला.
मोर्चाची सुरुवात मलकापूरच्या विठ्ठल मंदिरातून झाली. येथील तहसील कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर सभा झाली. त्यावेळी खासदार राजू शेट्टी म्हणाले, ‘वनविभाग जंगलात प्राण्यांसाठी पाणी, चाऱ्याची सोय करीत नाहीत.
त्यामुळे प्राणी पिकांचे नुकसान करतात. शेतकऱ्यांवर हल्ला करतात. मात्र नुकसानभरपाई व दवाखाना खर्च मिळत नाही. यापुढे संपूर्ण भरपाई मिळावी. वन विभागाने प्राणी शेतात येणार नाहीत याचीही व्यवस्था करावी. महावितरणने खराब ट्रान्सफॉर्म बदलावेत. नियमित वीज द्यावी.
चुकीची बिले दुरुस्त करावीत. वीज मीटर द्यावीत. रेशन पुरवठ्याबाबत असणाऱ्या तक्रारी आणि पीएम किसानचा लाभ शेतकऱ्यांना वेळेत मिळावा. अधिकाऱ्यांनी मागण्यांबाबत दिलेली आश्वासने पाळून वेळेत कामे करावीत, अन्यथा पुन्हा मोर्चा काढू, असा इशारा शेट्टी यांनी दिला.
शेतकरी कामगार पक्षाचे भारत पाटील म्हणाले, की वन विभाग आणि महावितरणचे अधिकारी शेतकऱ्यांना दाद देत नाहीत. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्री काम करावे. त्यानंतरच त्यांना शेतकरी रात्री कसा शेतात पाणी देतो हे कळेल.’ तहसीलदार गुरू बिराजदार, वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे, अमित भोसले, महावितरणचे अभियंता शामराज यांनी मोर्चासमोर येऊन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
मागण्या आणि तक्रारी सोडवण्याचे आश्वासन दिले. मोर्चात माजी खासदार राजू शेट्टी, शेकापचे भारत पाटील, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, जालंदर पाटील, वैभव कांबळे, तालुकाध्यक्ष वसंत पाटील, शेकापचे तालुकाध्यक्ष राजेंद्र देशमाने, राजू मगदूम यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.