
Kolhapur : सत्तारूढ आघाडीने विद्यमानांना डावलले
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्तारूढ राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांची आज घोषणा करण्यात आली. यात एकाही विद्यमान संचालकांना स्थान मिळालेले नाही; तर समितीचे माजी सभापती पैलवान संभाजी पाटील, अशासकीय मंडळाचे सदस्य सूर्यकांत पाटील यांना पॅनेलमध्ये पुन्हा संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, या सर्वपक्षीय पॅनेलमध्ये भारतीय जनता पक्षालाही संधी देण्याचे प्रयत्न ‘जनसुराज्य’ चे आमदार डॉ. विनय कोरे यांच्या माध्यमातून सुरू होते. पण आज जाहीर केलेल्या यादीत भाजपला वगळून पॅनेल केल्याचे स्पष्ट झाले. यावर भाजपची भूमिका काय असणार, हे उद्या स्पष्ट होणार आहे.
बाजार समितीवर यापूर्वी काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील वगळता दोन्ही काँग्रेससह जनसुराज्य शक्ती पक्षाची सत्ता होती. यावेळी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दोन्ही काँग्रेससह जनसुराज्य शक्ती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेला संधी देण्याबाबत गेल्या दोन-तीन दिवसांपासून नेत्यांच्या बैठका सुरू होत्या.
काल (ता. १८) रात्री झालेल्या चर्चेनंतर पक्षनिहाय कोणाला किती जागा द्यायच्या यावर शिक्कामोर्तब झाले. त्यात राष्ट्रवादीला सहा, काँग्रेसला व जनसुराज्यला प्रत्येकी तीन, शिंदे गटाचे खासदार प्रा. संजय मंडलिक व आमदार प्रकाश आबिटकर यांना प्रत्येकी एक तर ठाकरे गटाचे माजी आमदार संजय घाटगे यांना एक जागा देण्यावर शिक्कामोर्तब झाले.
त्यानंतर ठरल्याप्रमाणे नेत्यांनी दिलेल्या नावांच्या उमेदवारांची घोषणा आज पॅनेलचे समन्वयक व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी जाहीर केली. ‘राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या म्हणजेच शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत. निश्चित झालेल्या उमेदवारांव्यतिरिक्त उर्वरित उमेदवारांनी माघार घेऊन या पॅनेलला पाठबळ द्यावे आणि सहकार्य करावे’, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.
विकास सेवा संस्था : ११
सर्वसाधारण गट : ७
भरत बाबासो पाटील-भुयेकर (रा. भुयेवाडी ता. करवीर), संभाजी आकाराम पाटील- पैलवान (रा. कुडित्रे, ता. करवीर, पी. एन. पाटील गट), शेखर शंकरराव देसाई (रा. सोनाळी, ता. भुदरगड, के. पी. पाटील गट), सूर्यकांत रघुनाथ पाटील (रा. बाचणी, ता. कागल, हसन मुश्रीफ गट), प्रकाश पांडुरंग देसाई (रा. देसाईवाडी, ता. पन्हाळा, डॉ. विनय कोरे गट), राजाराम तुकाराम चव्हाण (रा. येळवण जुगाई, ता. शाहूवाडी, मानसिंगराव गायकवाड गट), बाळासाहेब गणपती पाटील (रा. वंदूर, ता. कागल, प्रा. संजय मंडलिक गट).
महिला प्रतिनिधी : २
सोनाली शरद पाटील (रा. अर्जुनवाडा, ता. राधानगरी, ए. वाय. पाटील गट), मेघा राजेंद्र देसाई (रा. पुष्पनगर ता. भुदरगड, के. पी. पाटील गट).
इतर मागासवर्ग :
एक- शंकर दादासो पाटील (रा. शिवारे, ता. शाहूवाडी, विनय कोरे गट)
भटक्या विमुक्त जाती-जमाती- एक- संदीप कृष्णा वरंडेकर (रा. दासेवाडी, ता. भुदरगड, प्रकाश आबिटकर गट).
ग्रामपंचायत सदस्य गट : ४
सर्वसाधारण- शिवाजी महादेव पाटील (रा. कसबा तारळे, ता. राधानगरी, ए, वाय. पाटील गट), सुयोग सुभाष वाडकर (रा. खेबवडे, ता. करवीर, सतेज पाटील गट), आर्थिकदृष्ट्या दुर्बल- पांडुरंग गणपती काशीद (रा. यवलूज, ता. पन्हाळा,
विनय कोरे गट) अनुसूचित जाती जमाती -नाना धर्माजी कांबळे (रा. साके, ता. कागल, ठाकरे गट- संजय घाटगे).
तीन उमेदवारांची आज घोषणा
ग्रामपंचायत व विकास संस्था गटातील १५ उमेदवार आज जाहीर केले आहेत. उर्वरित आडते व व्यापारी गटातील दोन व हमाल-मापडी गटातील एका उमेदवारांच्या नावाची घोषणा उद्या (ता. २०) करण्यात येईल. यापैकी एका जागेवर भाजपला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.