कोल्हापूर : कोरोनात साहित्य पुरवलेले गोत्यात

प्रशासन ढिम्म, अनेक जण कर्जबाजारी
Corona
Corona sakal

कोल्हापूर: कोरोना काळात जिल्हा प्रशासनाने उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये जेवण, पाण्यासह इतर साहित्य पुरवलेले ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. गेल्यावर्षी पुरवलेल्या या साहित्यांचे पैसेच संबंधितांना न मिळाल्याने काहीजण कर्जबाजारी झाले आहेत. गेल्यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत कोरोनाची रुग्णसंख्या जास्त होती. सौम्य लक्षणाच्या कोरोना बाधितांना अलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शहरासह तालुक्याच्या ठिकाणी सुमारे २६ कोविड सेंटरची उभारणी केली होती. या सेंटर्समधील रुग्णांना सकाळचा नाष्टा, चहा, दुपारचे व रात्रीचे जेवण देण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. त्यातून निवड झालेल्या ठेकेदारांनी या साहित्यांचा पुरवठा केला आहे. सप्टेंबरमध्ये ही कोविड सेंटर बंद केली; पण रुग्णांना साहित्य पुरवलेल्या ठेकेदारांना दमडीही मिळालेली नाही.

कोरोना काळात पुकारलेल्या लॉकडाउनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींचे छोटे-मोठे व्यवसाय बंद पडले. अशांपैकी काहींनी संस्था स्थापन करून या साहित्यांचा पुरवठा कोविड सेंटरना केला होता. यासाठी काहींनी पै-पाहुणे, मित्र यांच्याकडून हात उसने पैसे घेतले होते. काहींनी यासाठी लागणारे साहित्य उधारीवर खरेदी केले होते. अनेकांनी खासगी सावकारांकडूनही पैसे घेऊन यात खंड पडू दिला नव्हता. कोविड सेंटरमधील रुग्णांची हेळसांड होऊ नये, आज ना उद्या पैसे मिळतील या आशेवर या ठेकेदारांनी साहित्य पुरवले; पण आता त्याच्या पैशासाठी संबंधितांना हेलपाटे मारावे लागत आहेत.

हे पैसे मिळावेत म्हणून ठेकेदार वारंवार जिल्हाधिकारी कार्यालयात जातात; पण त्यांना निधी आलेला नाही, येईल त्यावेळी पैसे देऊ, असे सांगून बोळवण केली जात आहे. यासाठी आरोग्य विभागाकडून निधीच न आल्याचे सांगितले जाते. संबंधितांना निविदा काढून रितसर वर्क ऑर्डर देऊन हे काम करून घेण्यात आले. ठेकेदारांनीही अडचणीच्या काळातही या कामात खंड पडू दिला नाही; पण आता त्यांना घातलेल्या पैशाच्या वसुलीसाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे.

गरज सरो...

कोरोना काळात जिल्ह्यातील काही मंडप व्यावसायिकांनी कोविड सेंटरसह पोलिसांच्या उभारण्यात आलेल्या छावण्यांसाठी मंडप घातले. त्यावेळी संबंधितांना पैसे देऊ, असे सांगितले होते. आता तुम्हाला या कामाची रितसर वर्क ऑर्डर होती का, असे प्रश्‍न विचारून पैसे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. ही रक्कमही काही कोटीत आहे. हा प्रकार म्हणजे ‘गरज सरो, वैद्य मरो’ या म्हणीसारखा आहे.

सुमारे साडेसहा कोटी थकीत

कोविड सेंटर्सना साहित्य पुरवठा केलेल्या ठेकेदारांचे सुमारे सहा कोटी ६५ लाख रुपये देणे बाकी आहे. यात डिसेंबर २०२१ अखेरची रक्कम सहा कोटी २१ लाख ४९ हजार ८६८ रुपये व जानेवारी २०२१ अखेरची ४३ लाख ७२ हजार ३३२ रुपयांची रक्कम देणे बाकी आहे. ही रक्कम मिळावी असा प्रस्ताव २४ फेब्रुवारीला पाठवण्यात आला; पण अजूनही निधी मिळालेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com