
कोल्हापूर : खासदार मंडलिक जिल्ह्यात आमच्यासोबतच
कोल्हापूर : राज्यात जरी खासदार संजय मंडलिक यांची वेगळी भूमिका असली तरी जिल्ह्यातील राजकारणात ते आमच्यासोबतच राहणार, असा दावा माजी मंत्री सतेज पाटील यांनी काँग्रेस कमिटीत झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
दरम्यान, जिल्ह्यातील एका अपप्रवृत्तीला बाहेर काढले. त्यामुळे ‘गोकुळ’सह इतर संस्थांत राजकारणात काहीही फरक पडणार नाही, असा विश्वास माजी मंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. शिवसेनेतून गेलेल्या ४० आमदार आणि १२ खासदारांना भाजप पद आणि तिकीट देणार का, असा अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही.
अपात्रतेबाबत न्यायालयाच्या निकालानंतरच राजकारण वेगळे असू शकते, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. श्री. पाटील म्हणाले, ‘राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. तोपर्यंत संयम ठेवला पाहिजे. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत न्यायालयात कोणता निर्णय होतो, त्यावर बऱ्याच जणांचे भवितव्य अवलंबून आहे. ४० आमदारांना व बारा खासदारांना भाजप पद आणि तिकीट देणार का, सध्या या गोष्टी प्राथमिक आहेत. खासदार संजय मंडलिक यांच्याशी तीन तास चर्चा झाली. जिल्ह्यात चांगले राजकारण करत आहोत.
ते म्हणाले, ‘सहकार, जिल्हा परिषद, सहकारी संस्थांमध्ये एकत्रित निवडणूक लढवली. गेली सात वर्षे एका प्रवृत्तीविरोधात लढा दिला त्या प्रवृत्तीच्या मांडीला मांडी लावून पुन्हा बसणार आहेत का, कदाचित त्यांना निधी मिळावा किंवा भविष्याच्या राजकारणाच्या हेतूने निर्णय घेतला असेल. जिल्ह्यात खासदार मंडलिक आपल्यासोबतच राहतील. पक्ष, गट-तट बाजूला ठेवून काम करतो. त्यामुळे आमचा एकोपा कायम राहील.’
सूडबुद्धीचे राजकारण
पाटील म्हणाले, ‘ईडीची कारवाई करायची आणि विरोधक संपवायचे असेच धोरण सुरू आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणले जात आहे. राष्ट्रपती निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार विरोधी उमेदवाराला विजयासाठी प्रयत्न करत असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांवर कारवाई केली जाते. अशा दबावाला बळी पडणार नाही.’
पुनर्वसन मंत्री नेमा
मदत आणि पुनर्वसन मंत्री तत्काळ दिला पाहिजे. राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सुमारे १०० लोक दगावली आहेत. त्यामुळे या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी किमान मदत व पुनर्वसन मंत्र्यांची तत्काळ नियुक्ती केली पाहिजे, असेही श्री. पाटील म्हणाले.
Web Title: Kolhapur Mp Sanjay Mandalik Satej Patil
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..