
कोल्हापूर : व्यापारी, अधिकाऱ्यांत हमरीतुमरी
कोल्हापूर: राजारामपुरी मेन रोड तसेच आडव्या गल्लीतील ‘सेटबॅक’मधील अतिक्रमणांवर महापालिकेने आज जोरदार कारवाई केली. दुपारी दोनपर्यंत मुदत देऊनही अतिक्रमणे काढली नसल्याने जेसीबी, गॅस कटर, तसेच कर्मचाऱ्यांकरवी कडक पोलिस बंदोबस्तात दुपारनंतर २८ बांधकामांवर हातोडा चालवला. नवव्या गल्लीत एका महिलेचे सलून तसेच एका सराफ व्यापाऱ्याच्या दुकानासमोरील सिमेंटचा टप्पा काढल्यावरून व्यापारी व कार्यकर्त्यांच्या जमावाने वाद घालून विरोध केला. अधिकारी व जमावात मोठी हमरीतुमरी झाली. यामुळे काहीकाळ वातावरण तणावपूर्ण बनले.
दरम्यान, ही कारवाई चुकीची तसेच तोंड पाहून केली जात असल्याचे सांगत माजी नगरसेविकेचे पती महेश उत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांनी जमाव जमवून विरोध केला; पण सेटबॅकमधील जागा व्यवसायासाठी नसून पार्किंगसाठी वापरायची असल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी कारवाई सुरूच ठेवली.
राजारामपुरीतील शाहू मिल चौकी ते नऊ नंबर शाळा या मार्गावरील सेटबॅकमधील अतिक्रमणे दूर केल्यानंतर बुधवारी सायंकाळीच महापालिकेने आवाहन केले होते. व्यापाऱ्यांना सेटबॅकमधील जागा वाहने पार्किंग करण्यासाठी उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी सिमेंटचे कट्टे, इतर बांधकाम, लोखंडी स्ट्रक्चर काढून घ्यावे, असे सांगितले होते. आज सकाळीही मेन रोड, बस रुट तसेच आडव्या गल्लींमध्ये वाहने फिरवून माईकवरून आवाहन केले होते. दुपारी दोन वाजेपर्यंत ती काढून घेण्यासाठी वेळ दिली होती. तोपर्यंत काही व्यापाऱ्यांनी शेड, फरशा काढून घेण्यास सुरू केले होते. ज्यांनी काढले नाही, त्यांची सेटबॅकमधील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. मेन रोडवरील पाचवी ते अकराव्या गल्लीपर्यंतची रहिवासी तसेच व्यावसायिक वापर असलेल्या इमारतींतील बंदिस्त पार्किंग खुली केली. सेटबॅकच्या जागेत असलेल्या मेडिकलमधील साहित्य कर्मचाऱ्यांनी बाहेर काढून दुकान उतरवले. तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्किंग करण्यास अडचणीचे ठरलेले सिमेंटचे कट्टे, संरक्षक भिंती, ग्रील जेसीबीच्या साहाय्याने तोडले. जिथे ग्रील अथवा बांधकामासाठी लोखंडी स्ट्रक्चर केले आहे, ते गॅस कटरने तोडले.
मोहिमेत नगररचना विभागाचे सहायक संचालक रामचंद्र महाजन, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, उपशहर अभियंता बाबूराव दबडे, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, परवाना अधीक्षक राम काटकर, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील, महादेव फुलारी, चेतन आरमाळ, गुंजन भारंबे, मयुरी पटवेगार, राजारामपुरी व लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस सहभागी होते. महापालिकेच्या नगररचना, विभागीय कार्यालय क्रमांक तीन व चार, अतिक्रमण निर्मूलन विभाग, परवाना व इस्टेट विभागामार्फत मोहीम राबविली. नोटीस न देता केली जात असलेली कारवाई चुकीची असून, त्याबाबत प्रशासक
डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे तक्रार करणार आहे. ज्या व्यापाऱ्यांचे व नागरिकांचे नुकसान झाले आहे, त्याची भरपाईची मागणी करणार आहे.
- महेश उत्तुरे, सामाजिक कार्यकर्ते.
महिलेच्या घराचे नव्हे तर सेटबॅकमध्ये बांधलेले अनधिकृत सलूनचे बांधकाम काढले आहे. सेटबॅकमधील जागा वाहने पार्किंग करण्यासाठी वापरायची आहेत. त्यासाठी कालपासून समुपदेशन केले होते.
- रमेश मस्कर, उपशहर रचनाकार.
आरोप व वादावादी
नवव्या गल्लीतील दोन ठिकाणी कारवाई झाल्यानंतर महेश उत्तुरे तिथे आले. नोटीस न देता कारवाई केली जात आहे, आडव्या गल्लींमध्ये कारवाई करायची नाही, असे ठरले होते. तसेच एका महिलेच्या घराचे बांधकाम तोडल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी तसेच जमलेल्या जमावाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आणले. तसेच त्यांच्यावर आरोप करू लागल्यानंतर अधिकारी व व्यापाऱ्यांत हमरीतुमरी, वादावादी झाली. अधिकाऱ्यांनी तुम्ही तक्रार करू शकता; पण आता सरकारी कामात अडथळा आणू नका. फौजदारी गुन्हा आहे, असे सांगितल्यानंतर जमाव पांगला.
Web Title: Kolhapur Municipal Action Closed Parking Traders Officials
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..