कोल्हापूर ‘उत्तर’साठी चुरशीने ६१.१९ टक्के मतदान

राज्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागून राहिलेल्या आणि दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज चुरशीने सुमारे ६१.१९ टक्के मतदान झाले.
Voters in Kolhapur
Voters in KolhapurSakal
Summary

राज्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागून राहिलेल्या आणि दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज चुरशीने सुमारे ६१.१९ टक्के मतदान झाले.

कोल्हापूर - राज्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागून राहिलेल्या आणि दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या विधानसभेच्या (Vidhansabha) कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Kolhapur North Constituency Byelection) आज चुरशीने सुमारे ६१.१९ टक्के मतदान (Voting) झाले.

गेले १५ दिवस आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या निवडणुकीचे उत्तरही मतदान यंत्रात बंद झाले. कार्यकर्त्यांची ईर्ष्या, नेत्यांच्या भेटीगाठी त्यातून निर्माण झालेल्या वादाचे किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत झाले.

मतमोजणी शनिवारी (ता. १६) सकाळी आठ वाजता राजाराम तलाव परिसरातील शासकीय गोदामात होणार आहे.

या मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पदासाठी ही निवडणूक होती. या रिंगणात १५ उमेदवार होते; पण खरी लढत काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती जयश्री जाधव व भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्यामध्ये होती. मतदारसंघात २ लाख ९१ हजार ५३९ मतदार आहेत. ३५७ केंद्रांवर मतदान झाले. मतदारसंघात महापालिकेचे ५३ प्रभाग येतात. महापालिकेच्या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणूनच या निवडणुकीकडे बघितले गेले. त्यामुळेच मतदानात दोन्ही बाजूंनी प्रचंड ईर्ष्या पाहायला मिळाली.

काँग्रेस व भाजपनेही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे राज्य पातळीवरील नेत्यांच्या प्रचाराने मतदारसंघात रान उठवले होते. भाजपकडून विधानसभा, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्यांसह पक्षाचे राज्याच्या विविध भागातील आमदार मैदानात उतरले होते. महाविकास आघाडीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह डझनभर मंत्र्यांच्या सभांनी प्रचारात रंगत आणली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्हर्च्युअल सभेने महाविकास आघाडीच्या प्रचाराची सांगता झाली.

सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. तत्पूर्वीच मतदान केंद्राबाहेर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी बूथ घालणे, याद्या ठेवणे यासाठी गर्दी केली होती. खबरदारीचा उपाय म्हणून सर्वच मतदान केंद्रावर कडक पोलिस बंदोबस्त तैनात होता. संवेदनशील भागात केंद्रीय राखीव दलाचे जवान तैनात होते. भाजपच्या बूथवर भगवे कापड लावण्यावरून झालेली वादावादी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भेटीवेळी झालेल्या घोषणाबाजीमुळे निर्माण झालेला तणाव वगळता मतदान शांततेत झाले.

मतदारांना आकर्षित करण्यासाठी ९७ विशेष मतदान केंद्रे होती. या केंद्रावर मतदान अधिकाऱ्यांपासून सर्व कर्मचारी महिला होत्या. फुले, फुगे लावून या केंद्रांची सजावट केली होती. केंद्राबाहेर मंडप होता.

दिव्यांग, ज्येष्ठांसाठी घरात जाऊन मतदान

मतदानाच्या प्रक्रियेत राखीवसह २३९२ कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. पैकी २५० कर्मचारी राखीव होते. मतदानासाठी ३५७ यंत्रे वापरण्यात आली तर ११५ यंत्रे राखीव ठेवली होती. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांचे घरात जाऊन मतदान नोंदवण्याचा राज्यातील पहिलाच प्रयोग या निवडणुकीत करण्यात आला. त्यालाही प्रतिसाद मिळाला. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रावण क्षीरसागर यांनी काम पाहिले. त्यांना सहायक म्हणून कल्पना कापसे, संतोष कणसे यांनी सहकार्य केले.

असे झाले मतदान

(आकडे टक्केवारीत)

सकाळी ७ ते ९ - ६.९६

९ ते ११ - २०.५७

११ ते दुपारी १ - ३४.१८

१ ते ३ - ४४.९३

३ ते सायंकाळी ५ - ५५.२६

सायंकाळी ६ पर्यंत - सुमारे ६१

महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते माझ्या प्रचारासाठी राबले. कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासाचे मुद्दे घेऊन जनतेच्या समोर गेलो. या वेळी आबालवृद्ध, महिला, तरुण, तरुणी यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला. आज सर्व मतदान केंद्रांना भेटी दिल्या. त्या वेळी मतदारांमध्ये उत्साह दिसत होता. म्हणूनच विजयाची १०० टक्के खात्री आहे.

- जयश्री जाधव, काँग्रेस उमेदवार

भाजपने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन काम केले. निवडणुकीचा प्रचार आम्ही चांगला केला आहे. मतदारांनीही चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे विजयाची खात्री आहे.

- सत्यजित ऊर्फ नाना कदम, भाजप उमेदवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com