Kolhapur News : अनागोंदी कारभारामुळे रुग्णांना नाहक आर्थिक भुर्दंड | Kolhapur Patient CPR and money private service | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur News

Kolhapur News: अनागोंदी कारभारामुळे रुग्णांना नाहक आर्थिक भुर्दंड

कोल्हापूर : रात्री किंवा दुपारनंतर बहुतांश वरिष्‍ठ डॉक्टर सीपीआरमध्ये थांबत नाहीत. तेव्हा वैद्यकीय यंत्रणाही शिथिल पडतात. हीच संधी साधून रुग्णांना गैरसोयींची भीती घालत सीपीआरच्या रुग्णांना खासगी वैद्यकीय क्षेत्रातून रक्त तपासणी, औषधे आणण्यापासून ते चाचण्यांसाठी खासगी हॉस्पिटलकडे पाठवले जाते.

त्यासाठी काही खासगी एजंट व सीपीआरमधील कर्मचारी रुग्णांच्या नातेवाइकांना भूलथापा लावत खासगी क्षेत्राची कमाई करून देतात. अशा प्रकारांना चाप कोण लावणार, हा मोठा प्रश्न आहे.

सीपीआरमध्ये रक्तपेढी आहे, तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत. येथे रक्ताच्या चाचण्यांची सुविधा असूनही काही ठराविक चाचण्या खासगी प्रयोगशाळेतून करण्यास सांगितले जाते. काही वेळा खासगी रक्तपेढीचे प्रतिनिधी सीपीआरमध्ये येऊन रक्ताचे नमुने घेऊन जातात.

रक्त हवे असल्यासही खासगी पेढीकडे जावे लागते. सीपीआरची स्वतःची रक्तपेढी असतानाही असे का घडते, याचे उत्तर कोणाकडेच नाही.

सीपीआरमध्ये सीटीस्कॅन केले जाते. त्याचे रिपोर्ट दुपारी चारपर्यंत मिळतात. त्यानंतर कोणा जखमीचे तातडीने सीटीस्कॅन करणे आवश्यक असल्यास तंत्रज्ञ नाहीत असे सांगून सीटीस्कॅन उद्या किंवा दोन दिवसांनी होईल असे सांगितले जाते.

त्यात सुट्टी असेल तर रुग्णांची अडचण होते. हीच संधी साधून सीपीआरच्या आवारात वावरणारे एजंट किंवा वैद्यकीय कर्मचारी काहीवेळा खासगी लॅबमधून सीटी स्कॅन करून आणा, असा सल्ला देतात.

प्रसुती विभागात सोनोग्राफी फक्त इमर्जन्सी रुग्णांची केली जाते. इतर गरोदर मातांनी खासगी लॅबमधून सोनोग्राफी करून आणावी, असा सल्ला वॉर्डातील काही आया किंवा परिचारिकांकडून दिल्याचे सांगण्यात येते.

सीपीआरच्या नवजात बालकांच्या कक्षातील ३० इन्क्युबिलेटर नेहमीच हाऊसफुल्ल असतात. तातडीने उपचाराची गरज असलेल्या अर्भकांना खासगी इन्क्युबिलेटर सेंटरकडे नेण्याचा सल्ला दिला जातो. तेथे दिवसाला पाच हजार रुपये शुल्क आकारले जाते. त्यामुळे रुग्णांना याचा नाहक भुर्दंड सहन करावा लागतो.

हे दुष्टचक्र थांबणार कधी?

सीपीआरमध्ये एमआरआय वगळता सर्व आधुनिक सुविधा असूनही त्यातील ७० टक्के सुविधा २४ तास उपलब्ध नसतात, त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते.

पैसे मोजून खासगी क्षेत्रातून सेवा घ्यावी लागते. त्यामुळे खासगी क्षेत्राची कमाई होऊन रुग्णांचा मनस्ताप वाढतो आणि एजंटांना कमिशन मिळते, असे हे दुष्टचक्र थांबणार कधी, हा प्रश्न गंभीर बनला आहे.