Police
Police esakal

कोल्हापूर : पोलिस असल्याचे भासवून साडेअकरा तोळे सोने पळविले

महिलेची मोहनमाळ हातोहात पळविली. जवाहरनगरात भरदिवसा हा प्रकार घडला.

कोल्हापूर : आम्ही इन्स्पेक्टर, पोलिस आहोत अशी बतावणी करून दोन भामट्यांनी महिलेची मोहनमाळ हातोहात पळविली. जवाहरनगरात भरदिवसा हा प्रकार घडला. याची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी आशा शिंदे जवाहनगरात राहतात. त्या आज दुपारी मंदिरात गेल्या होत्या. दरम्यान, मार्गावर दोन जण थांबले होते. त्या दोघांनी त्यांना बोलवून घेतले. त्यापैकी एकाने त्यांना ‘आम्ही इन्स्पेक्टर पोलिस आहोत, आम्ही ड्यूटीकरिता येथे थांबलो आहे. तुम्ही तुमच्या गळ्यातील सोन्याचे दागिने घातले आहेत, ते घालू नका, ते काढून पिशवीत ठेवा,’ असे सांगितले. त्यानुसार शिंदे यांनी गळ्यातील ६० हजारांची १३ ग्रॅमची सोन्याची बोरमाळ काढून स्वतःजवळच्या पिशवीत ठेवली.

त्या वेळी संबधित दोन संशयितांनी त्यांना असे करू नका, दागिना कागदात ठेवा असे सांगितले. त्यानुसार त्यांनी पिशवीतून मोहनमाळ काढून ती दोघांनी दिलेल्या कागदात ठेवली. त्या दोघांनी ती माळ हातोहात पळविली. त्या कागदात खडे घालून तो शिंदे यांच्याकडे दिला. त्यांनी तो पिशवीत ठेवला. घरी जाऊन पाहिल्यावर कागद पाहिल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले, अशी फिर्याद शिंदे यांनी दिली. अमलदार साळवी प्राथमिक तपास करीत आहेत.

गडहिंग्लजमध्ये दोन वृद्धांना साडेसहा तोळ्यांना गंडा

गडहिंग्लज : पोलिस असल्याचा बहाणा करून दोन महिलांकडील साडेसहा तोळ्यांचे दागिने पळविल्याची घटना शहरातील डॉक्टर कॉलनीत आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. दरम्यान, अशाच प्रकारची महिनाभरातील ही दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी भीमनगरजवळ अशीच घटना घडली होती. प्रेमीला विश्रामभाई पटेल (वय ७०, आमतूर टोलगेट, सागर रोड, शिमोगा) व गंगाबेन वालजी पटेल (७२, जंगीरपुरा, ता. सुरत) अशी फसवणूक झालेल्या महिलांची नावे आहेत.

याबाबतची माहिती अशी प्रेमीला व गंगाबेन दोघीही डॉक्टर कॉलनीतील भरत पटेल यांच्या पाहुण्या आहेत. त्या भरत यांच्या घरी आल्या होत्या. आज सायंकाळी पावणेसातच्या सुमारास त्या घराबाहेर पडल्या. लायन्स ब्लड बँकेजवळ आल्यावर त्यांना मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी गाठले. त्यातील एकाने महिलांसमोरच त्याच्याच एका सहकाऱ्याला दरडावून त्याच्याकडील सोन्याची अंगठी व चेन काढून घेतली आणि पुडी बांधून दिली. ती पुडी काढून पाहता त्यात दागिने होते. त्यानंतर त्याने त्या महिलांना उद्देशून अशावेळी महिलांनी अंगावर दागिने घालू नयेत, असे सांगून त्यांनाही दागिने काढून देण्यास सांगितले व दोन पुड्यात ते दागिने बांधले. त्यात प्रेमीलाचे साडेतीन तोळ्यांचे पेंडल चेन, तर गंगाबेनचे तीन तोळ्यांच्या चेनचा समावेश होता.

पुड्या देताना मात्र दागिन्यांच्या पुड्यांऐवजी हातचलाखी करून वेगळ्या पुड्या देऊन दोघेही मोटारसायकलवरून पसार झाले. पुड्या उघडून पाहताच त्यात दागिने नव्हते. फसवणूक झाल्याचे कळताच त्या महिलांनी ओरड केली. त्यानंतर पोलिसांत या घटनेची माहिती दिली. पोलिसानी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. महिलांनी फसवणूक केलेल्या व्यक्तींचे वर्णन सांगितले आहे. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी करून पोलिस तपास करीत आहेत.

गारगोटीत वृद्धेच्या बांगड्या पळविल्या

गारगोटी : येथील बसस्थानकासमोर पोलिस असल्याची बतावणी करून वृद्धेच्या सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या चार तोळ्यांच्या बांगड्या लंपास केल्याची घटना आज सायंकाळी घडली. या चोरीची नोंद भुदरगड पोलिसांत झाली आहे. साई कॉलनीतील शोभा मारुती सावंत या वृद्धा गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कोल्हापूरला जाण्यासाठी बसस्थानकाकडे जात होत्या. या दरम्यान गारगोटी-कोल्हापूर रस्त्यावर भारत बेकरीसमोर चोरट्यांनी या वृद्धेस आपण साध्या वेशातील पोलिस असून, पुढे तपास सुरू आहे. त्यामुळे आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून ठेवा, असे सांगून पिशवीत ठेवण्याचा बहाणा करून नकली पाटल्या पिशवीत ठेवून पोबारा केला. बसस्थानकात गेल्यावर वृद्धेने आपल्या पाटल्या हातात घालण्यासाठी पाहिल्या असता त्या नकली असल्याचे निदर्शनास आले. याबाबतची फिर्याद शोभा मारुती सावंत या वृद्धेने पोलिसांत दिली.

तोतया अधिकारी ताब्यात

कुरुंदवाड पोलिस उपनिरीक्षकाची वर्दी घालून चारचाकीतून फिरत असताना सांगली येथील तरुणाला येथील पोलिसांनी ताब्यात घेतले. सागर भय्यासो भोसले (रा. विश्रामबाग, ता. मिरज, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. येथील पोलिसांत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. कुरुंदवाड- शिरढोण मार्गावर गस्त घालत असताना सहायक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे यांना संशयित सागर भोसले हा सापडला.

याबाबत अधिक माहिती अशी ः कुरुंदवाड हद्दीतील शिरढोण रस्त्यावर संशयित आरोपी सागर भोसले हा पोलिस उपनिरीक्षकाची खाकी वर्दी परिधान करून खांद्यावर दोन्ही बाजूंना प्रत्येकी दोन स्टार, लाल-निळ्या रंगाची फित, पोलिस उपनिरीक्षक सागर भ. भोसले अशी नेमप्लेट, रेड बेल्ट, रेड कलरचे बूट परिधान करून चारचाकी मोटार (एमएच-१०-डीजी ३४८७)मधून शिरढोणकडे जात होता. सहायक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे गस्त घालत असताना सागर भोसले यास अडवून माहिती घेतली. त्या वेळी त्यांना संशय आल्याने ताब्यात घेऊन तपास केला असता तो पोलिस वर्दी घालून तोतयागिरी करीत असल्याचे उघड झाले. सागर भोसलेवर गुन्हा दाखल झाला आहे.

संशयितांचा शोध सुरू

दोघापैकी एक संशयित ३५ ते ४० वयोगटातील असून, तो अंगाने जाड असून, त्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केल्याची माहिती पुढे आली आहे. परिसरातील सीसीटीव्ही आधारे संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com