Kolhapur Crime News: उचगावच्या दोघांची १८ लाखांची फसवणूक | Kolhapur Railway Police Extortion name recruitment | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur Crime News

Kolhapur Crime News: उचगावच्या दोघांची १८ लाखांची फसवणूक

गांधीनगर : रेल्वे पोलिसमध्ये भरती करतो, असे सांगून विश्वास संपादन करून संगनमताने उचगाव (ता. करवीर) येथील दोघा तरुणांची अठरा लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी गांधीनगर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून तिघांवर गुन्हा दाखल झाला.

उदय एकनाथ नीळकंठ (मूळ रा. मंगेश्वर कॉलनी, उचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर, सध्या रा. कोगनोळी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली), गोविंद गंगाराम गुरव व नवनाथ ऊर्फ यशवंत जगन्नाथ गुरव (दोघेही रा. चोपडेवाडी, ता. भिलवडी, जि. सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

श्रीधर शिवाजी शिंदे, दीपक जयसिंग अंगज (रा. सावंत गल्ली, उचगाव) अशी फसवणूक झालेल्या तरुणांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित उदय नीळकंठ हा पूर्वी उचगाव येथे वास्तव्यास होता. त्यावेळी दीपक अंगज यांचे वडील जयसिंग अंगज यांच्याशी त्यांची ओळख झाली. नीळकंठ याने गोविंद गुरव व नवनाथ गुरव यांच्याशी जयसिंग अंगज यांची ओळख करून दिली.

या सर्वांचे एकमेकांकडे येणे-जाणे होते. नीळकंठ, गोविंद व नवनाथ गुरव या तिघांनी जयसिंग अंगज व त्यांचा मुलगा दीपक व त्याचा मित्र श्रीधर शिंदे यांचा विश्वास संपादन केला. मुलगा दीपक व श्रीधर शिंदे यांना रेल्वे पोलिसमध्ये भरती करतो,

असे सांगून या तिघांनी संगनमताने जयसिंग अंगज यांच्याकडून दहा लाख व श्रीधर शिंदे यांच्याकडून आठ लाख रुपये घेतले. जयसिंग अंगज यांनी कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी बँकेच्या शाखेतील आपल्या खात्यातून दहा लाख व श्रीधर शिंदे यांच्या कोल्हापुरातील दसरा चौकातील बँकेच्या शाखेतील खात्यातून आठ लाख रुपये ‘आरटीजीएस व गुगल पे’द्वारे या तिघा संशयित आरोपींना मार्च २०२१ मध्ये दिले.

रेल्वेमध्ये आज पोलिस भरती करतो, उद्या करतो, असे सांगत बराच कालावधी या तिघांनी घालवला. दोन वर्षांचा कालावधी उलटत आला तरी रेल्वे पोलिसांत दीपक व श्रीधरची भरती झाली नाही. त्यानुसार तक्रार दाखल झाल्याने उदय नीळकंठसह तिघांवर संगनमताने फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून याबाबतचा अहवाल न्यायालयास सादर केला आहे.

दोन वर्षांनंतरही टाळाटाळ

पैसे घेऊन दोन वर्षे उलटली तरीही वारंवार तगादा लावूनही पोलिस भरती करण्यासाठी तिघांकडून टाळाटाळ करत असल्याचे अंगज यांच्या लक्षात आले, त्यावरून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जयसिंग अंगज यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.